जेएनयूमध्ये उभारणार छत्रपती शिवरायांचा पुतळा, मुख्यमंत्र्यांची घोषणा

हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला जात होता, यापुढेही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत राहतीलच, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र तसेच कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी फडणवीस म्हणाले, आज खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, या विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक शक्तीचा आविष्कार आणि त्याचे अध्यापन करण्याचे काम सुरू होत आहे. शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीचा जगभरात अभ्यास केला जातो. शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसाचा दर्जा दिला. सह्याद्रीच्या घाटात, दऱ्याखोऱ्यात एक एक जागा अशी निवडली आहे की किल्ल्याला अभेद्य बनवते. कितीही बलाढय़ शत्रू आला तरी हे किल्ले जिंकू शकणार नाही, अशी ही किल्ल्यांची रचना आहे. याचादेखील अभ्यास केला जाणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

भाषा संवादाचे माध्यम

मराठी भाषेने संपूर्ण भारताला समृद्ध केलं आहे. मराठी साहित्य उत्तम आहे, मराठी नाटय़सृष्टी ही देशातली सर्वोत्तम आहे. देशात थिएटर कुठल्या एका भाषेने टिकवलंच नाही तर समृद्ध केलं तर ती मराठी भाषा आहे. अशा या मराठी भाषेवर सगळीकडे आणि सगळ्या विद्यापीठांमध्ये संशोधन झालं पाहिजे. भाषा हे संवादाचं माध्यम आहे ते वादाचं माध्यम होऊच शकत नाही. प्रत्येक मराठी माणसाला मराठी अभिमान, स्वाभिमान आणि आग्रह आहे तो स्वाभाविकच आहे. मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे, पण इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.