
>> दिलीप ठाकूर
नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस मुंबईतील मनोरंजन क्षेत्रात संगीतात काही गोष्टी रुजल्या. ध्वनिफितींची विक्री मोठय़ाच प्रमाणावर होऊ लागली आणि त्याची मागणी पुरवण्यासाठी गैरफिल्मी गीत संगीताच्या ध्वनिफिती मोठय़ाच प्रमाणावर निर्माण होत गेल्या. त्यातील काही गाण्यांची निवड करून मग त्यावर पटकथा लिहून चित्रपट निर्माण होऊ लागले. या सगळ्यात नवीन पार्श्वगायक व पार्श्वगायिका यांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत गेली. त्यात एक होता, बबला मेहता. त्याचे 24 जुलै 2025 रोजी मुंबईत निधन झाले.
गीत संगीताचे हे पेव एकेका चित्रपटात आठ-दहा गाण्यांचा समावेश करण्यात दिसू लागले. आणि त्यात एक गाणे हमखास बबला मेहताचे असे. यश चोप्रा दिग्दर्शित ‘चांदनी’मध्ये लता मंगेशकर यांच्यासोबत तेरे मेरे होठों पे हे त्याने पार्श्वगायन केलेले पहिलेच गाणे लोकप्रिय ठरले. आनंद बक्षी यांच्या या गीताला शिव हरी यांचे संगीत आहे. त्यानंतर इंद्रकुमार दिग्दर्शित ‘बेटा’मध्ये अनुराधा पौडवालसोबत ये दो दिल है चंचल, महेश भट्ट दिग्दर्शित ‘सडक’मध्ये कुमार शानू व अनुराधा पौडवालसोबत तक धिन धिन तक, महेश भट्ट दिग्दर्शित ‘दिल है के मानता नही’मध्ये अनुराधा पौडवालसोबत गळ्यात साखळी सोन्याची अशी गाणी गायल्यावर बबला मेहता हिंदी चित्रपटाला अधिकाधिक प्रमाणात माहीत होत गेल्याने त्याला मोठय़ाच प्रमाणावर संधी मिळू लागली. याच काळात जुनी लोकप्रिय गाणी नवीन आवाजात याच्या मोठ्या प्रमाणावर ध्वनिफिती प्रकाशित होऊ लागल्या. त्यात बबला मेहताने मुकेशची जुनी गाणी मोठय़ा प्रमाणावर गायली. याच दशकात मोठय़ा प्रमाणात देश विदेशात स्टेज शोजचे प्रचंड पेव फुटले आणि बबला मेहता त्यातही गुंतत गेला. तो पार्श्वगायनासह संगीतकारही होता. त्यात त्याने अनेक ध्वनिफिती निर्माण केल्या.
बबला मेहता मूळचा दिल्लीचा. अनेकांप्रमाणेच कारकीर्द घडवण्यास तो 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत आला. आणि आपल्या गुणवत्तेला व्यावसायिक शिस्तीचे वळण देत देत यशस्वी ठरला. सगळ्या प्रकारच्या संधीचे त्याने स्वागत केले. भजन गीत आणि हिंदुस्तानी शास्त्राrय संगीत यात तो पारंगत होता. पहाडोवाली मातरानी, जग जनानी, जया श्री हनुमान, भक्ती सागर, बजरंग बाण असे अनेक भजन गीतसंग्रह त्याने प्रकाशित केले. पण अनेक चित्रपटांत त्याने पार्श्वगायन केले. ‘तहलका’ ‘जीने दो’ प्यार का रोग, छोटा सा घर, जनम से पहले, नामचीन, नजर, आतंक ही आतंक वगैरे अनेक चित्रपटांत त्याचे किमान एक गाणे आहे. संपूर्ण चित्रपटात आपल्या वाटेला एकच गाणे का, असा त्रागा न करता विविध संगीतकारांकडे यायला मिळतेय याला त्याने महत्त्व दिले. त्यात नदीम-श्रवण, राजेश रोशन, बप्पी लाहिरी, अनु मलिक यासारखे त्या काळातील आघाडीचे संगीतकार आहेत.
बबला मेहताचे आणखीन एक उल्लेखनीय कार्य म्हणजे, त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लिहिलेल्या चार कवितांना संगीत दिले, ज्या नवी दिल्लीत वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त सादर करण्यात आल्या. याव्यतिरिक्त त्यांनी जाहिरातींसाठी संगीत दिले आहे आणि ‘वाउंडेड’ (2007) चित्रपटाचे पार्श्वसंगीत दिले.
बबला मेहताने भारतासह विविध देशांमध्ये कॅनडा, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि अनेक युरोपीय आणि आशियाई राष्ट्रांमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स केला. याबरोबरच झुबन पे दर्द भरी दास्तान (1987) अशा काही संगीत संग्रहासाठी गायन केले. राजेश रोशन, शाहरुख खान, जुही चावला, अक्षय कुमार, बप्पी लाहिरी, माधुरी दीक्षित यांच्यासोबत लंडन, अमेरिका, कॅनडा अशा अनेक देशांत संगीत कार्यक्रमात गायन केले. प्रत्येक पायरीवर नवीन संधी त्याची जणू वाट पाहत होती. पण त्यानेही तेवढीच मेहनत घेऊन सातत्य कायम ठेवले.