
रत्नागिरी नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती खालावली असून त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. पगार द्यायला पैसे नसल्याने रत्नागिरी नगरपरिषदेने 55 कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले आहे. याचा फटका शहरातील स्वच्छता यंत्रणेवर बसला असून पूर्वी शहरात 18 घंटागाड्या धावत होत्या त्यांची संख्या आता 13 गाड्यांवर आली आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेत सुमारे 300 कंत्राटी कामगार आहेत. मे महिन्यापासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकले होते. एक दिवस कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. नगरपरिषदेकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत अशी अवस्था निर्माण झाल्याने आज रत्नागिरी नगर परिषदेने 55 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
7 वाजतानाची घंटा गाडी नऊला
कंत्राटी कामगार कमी केल्याचा फटका स्वच्छता यंत्रणेला बसला आहे. पूर्वी शहरात 18 घंटागाड्यातून कचरा गोळा करण्यात येत होता. कामगार कमी केल्यामुळे आता फक्त 13 घंटागाड्या धावत आहेत. त्यामुळे पूर्वी सकाळी 7 वाजता येणारी घंटागाडी आता त्या परिसरात सकाळी 9 वाजता जात आहे.
जनतेच्या कराचे पैसे कुठे जातात?
रत्नागिरी शहरातील नागरिक नगरपरिषदेचा मालमत्ता कर भरतात. 14 कोटी रूपयांचा कर नगरपरिषदेत जमा होतो. मग कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जे स्वच्छतादूत म्हणून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहेत. त्यांना पगार द्यायला पैसे का नाहीत? असा सवाल नागरिक विचारत आहेत.