
>> प्रसाद ताम्हनकर
जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या पाण्याच्या कमतरतेचा सामना करते आहे असा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल आहे. त्यातच आता AI साठी पाण्याचा प्रचंड वापर होऊ लागल्याने या संकटात मोठी भर पडणार असल्याची चिन्हे आहेत. AI अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान वापरताना विजेचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो आणि त्यामुळे या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणारी डाटा सेंटर थंड ठेवण्यासाठी पाण्याची मोठय़ा प्रमाणावर आवश्यकता भासते. काही काही डाटा सेंटर ही अनेक फुटबॉल मैदानांच्या आकारापेक्षादेखील मोठी आहेत. यावरून त्यांना किती पाण्याची आवश्यकता भासत असेल याचा अंदाज लावता येईल.
आपण जेव्हा जेव्हा कोणतेही ऑनलाइन काम करतो, जसे की फेसबुक वापरणे, एखादा ई-मेल पाठवणे, ChatGPT ला प्रश्न विचारणे, एखादा ऑनलाइन व्हिडीओ बघणे तेव्हा तेव्हा त्यासाठी हजारो संगणक असलेल्या डाटा सेंटरमधून त्याची प्रक्रिया होत असते. हे सर्व्हर सतत चालू असल्याने ते खूप गरम होतात. अशा वेळी त्यांना थंड ठेवण्यासाठी पाण्याची, विशेषत स्वच्छ आणि गोडय़ा पाण्याची आवश्यकता भासते. या डाटा सेंटरना पाण्याच्या मदतीने थंड ठेवण्याच्या विविध पद्धती आहेत. मात्र अशा काही पद्धतींमध्ये वापरण्यात येणाऱया पाण्यापैकी 80 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते. एका अमेरिकन अहवालानुसार, 2027 पर्यंत AI उद्योग क्षेत्र डेन्मार्कसारख्या एका देशापेक्षा चार ते सहापट जास्त पाण्याचा वापर करेल.
ChatGPT सारख्या AI बॉट्सच्या वाढत चाललेल्या वापरामुळे या समस्येत मोठी भर पडत चालली आहे. ChatGPT च्या मदतीने एखादे चित्र बनवणे, लेख तयार करणे अशा जटिल कामांना अधिक वेळ लागतो आणि काम जेवढे कठीण आणि मोठे तेवढी वीज जास्त प्रमाणात वापरली जाते. कारण इतर सोप्या कामांपेक्षा अशा कठीण कामासाठी संगणकीय ऊर्जा जास्त प्रमाणात वापरली जाते. जास्त विजेचा वापर म्हणजे जास्त उष्णता निर्माण होणे आणि उष्णता जेवढी जास्त तेवढा पाण्याचा वापर करण्याची गरज अधिक भासणार असे हे गणित आहे. AI चा वापर वाढत चाललेला असताना आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचा (आयईए) असा अंदाज आहे की, 2030 पर्यंत या डाटा सेंटर्सद्वारे केला जाणारा पाण्याचा वापर जवळ जवळ दुप्पट होणार आहे. या अंदाजामध्ये वीज निर्मिती आणि संगणकाच्या चिप्स बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचादेखील समावेश केला गेला आहे.
गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा यांसारख्या दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांच्या पर्यावरण अहवालानुसार, 2022 पासून त्यांच्या पाणी वापरात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. गुगलच्या पाणी वापरात तर दुपटीने वाढ झाली आहे. गुगलच्या अहवालानुसार, 2024 सालात त्यांनी एकूण 37 अब्ज लिटर इतक्या पाण्याचा वापर केला आहे. त्यापैकी 29 अब्ज लिटर पाणी पूर्णपणे वापरले गेले अर्थात त्याची वाफ झाली. या वापरलेल्या पाण्याची तुलना केली तर संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार जे लोक दररोज 50 लिटर पाणी वापरतात अशा 1.6 दशलक्ष लोकांच्या एक वर्षाच्या पाण्याची गरज या पाण्याने भागवता येईल, तर खुद्द गुगलच्या मते, इतक्या पाण्याच्या मदतीने नैऋत्य अमेरिकेतील 51 गोल्फ कोर्सना वर्षभरासाठी सिंचन करता येणे शक्य आहे.
गेल्या काही काळापासून दुष्काळग्रस्त किंवा कोरडे प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱया अॅरिझोना, युरोप, लॅटिन अमेरिका अशा भागांमध्ये डाटा सेंटर्सच्या वाढत्या विस्ताराला प्रचंड विरोध होऊ लागला आहे. स्पेनसारख्या देशात तर ‘युअर क्लाऊड इज ड्राइंग अप माय रिव्हर’ नावाची एक संघटना उभी राहिली आहे जी डाटा सेंटर्सच्या निर्मितीला आणि विस्ताराला मोठय़ा प्रमाणात विरोध करत आहे. गुगलसारख्या कंपनीला तर अशा निषेधाचा सामना करावा लागल्यामुळे चिली आणि उरुग्वेमधील त्यांच्या डाटा सेंटर्सच्या काही योजना बदलाव्या लागल्या आहेत, तर काही योजना थांबवाव्या लागल्या आहेत. आगामी संकटाची चाहूल घेऊन आता डाटा सेंटर्स थंड करण्यासाठी पाण्यापेक्षा इतर काही साधने वापरणे शक्य आहे का? हे शोधणे काळाची गरज बनली आहे हे नक्की!
[email protected]