चीन आणि अमेरिका स्वयंघोषित विश्वगुरूला ‘विश्वबुद्धू’ ठरवण्याचा कट रचतायत, सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा आहेर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत हिंदुस्थान व पाकिस्तानमध्ये युद्धबंदीसाठी इतर कोणत्याही देशाने प्रयत्न केले नसल्याचा दावा केला असला तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध त्यांच्यामुळेच थांबल्याचा दावा केला आहे. मोदी सरकारकडून याबाबत एकदाही ट्रम्प यांचा दावा स्पष्ट शब्दात खोटा ठरवण्यात आलेला नाही. त्यावरून सध्या मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. यातच आता या मुद्द्यावरून भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

”चीन व अमेरिका हे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्रितपणे स्वयंघोषित विश्वगुरूला ‘विश्वबुद्धू’ ठरवण्याचा व कश्मीर आणि इशान्य हिंदुस्थान ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनने तर आधीच लडाखमधल्या काही भूभागावर घुसखोरी केली आहे. यावर मोदी फक्त एवढंच म्हणतील, की कोई आया नही?, असा टोला लगावत स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरचा आहेर दिला आहे.