
अॅण्डरस-तेंडुलकर या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या फलंदाजांनी विस्फोटक खेळाचं प्रदर्शन केलं आहे. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रविंद्र जडेजा, ऋषभ पंत यांच्यासह सर्वच प्रमुख फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियाने 422 चौकार आणि 48 षटकार ठोकत ऑस्ट्रेलिया मागे टागलं आहे.
टीम इंडियाने सध्या सुरू असलेला पाचवा कसोटी सामना धरून जवळपास 470 चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकले आहेत. यामध्ये 422 चौकार आणि 48 षटकारांचा समावेश असून हा एक जागतिक विक्रम टीम इंडियाने आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी एका मालिकेत सर्वाधिक षटकार-चौकार मारण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. त्यांनी 1993 मध्ये अॅशेज मालिकेत 451 चौकार आणि 9 षटकार मारले होते. म्हणजेच 460 चेंडू त्यांनी सीमारेषेबाहेर धाडले होते. परंतु आता कंगांरूंचा हा विक्रम टीम इंडियाने मोडित काढत आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने पहिल्यांदाच 400 हून अधिक चेंडू सीमारेषेबाहेर ठोकण्याचा हा ऐतिहासिक कारनामा केला आहे. यापूर्वी टीम इंडियाने 1964 साली कसोटी मालिकेत 384 चेंडू सीमारेषेबाहेर फटकावले होते.
चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह टीम इंडियाच्या फलंदाजांनी शतके ठोकण्याच्या बाबतीतही विक्रमाला गवसणी घातली आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या एकूण 12 फलंदाजांनी शतके ठोकली आहेत. यापूर्वी असा कारनामा ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने केला आहे. या तीन्ही संघांच्या फलंदाजांनी एकाच कसोटी मालिकेत 12 शतके ठोकली आहेत.