
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि त्याचा मानवांवर होणारा परिणाम यावर आता सातत्याने चर्चा होतेय. अशातच चीनमध्ये एका रोबोटला थेट कॉलेजमध्ये प्रवेश मिळालाय. चीनच्या शांघाय थिएटर अकादमीने त्यांच्या पीएच.डी. प्रोग्राममध्ये जिउबा 01 नावाच्या रोबोटला प्रवेश दिला आहे. डॉक्टर (पीएचडी) होण्याची संधी मिळालेला हा जगातील पहिला रोबोट आहे. हा रोबोट चिनी ऑपेरावर पीएच.डी. करेल. जिउबा 01 रोबोट 1.75 मीटर उंच आणि 30 किलो वजनाचा आहे. त्याची त्वचा सिलिकॉनपासून बनलेली असल्याने त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव दिसून येतात. हा रोबोट 14 सप्टेंबरपासून कॉलेजला जाईल.
चिनी ऑपेराचा अभ्यास
हा पीएच.डी. कार्यक्रम 4 वर्षांचा असेल, ज्यामध्ये हा रोबोट पारंपरिक चिनी ऑपेराचा अभ्यास करेल. त्यात स्टेज परफॉर्मन्स, स्क्रिप्ट रायटिंग आणि सेट डिझाइन तसेच मोशन कंट्रोल आणि लँग्वेज जनरेशनसारखे तांत्रिक विषय समाविष्ट असतील. पीएच.डी. करण्यासाठी या रोबोटला व्हर्च्युअल स्टुडंट आयडीदेखील देण्यात आला आहे. प्रोफेसर यांग किंगकिंग विशेष मार्गदर्शक आहेत.