अंधेरीच्या पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास मार्गी लागणार, निविदा प्रक्रियेत चार कंपन्यांनी घेतला सहभाग

अंधेरी पूर्व पूनम नगर येथील पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडातर्फे करण्यात येणार आहे. या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी म्हाडाने निविदा काढली होती. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून चार कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. तांत्रिक निविदा प्रक्रियेनंतर आता म्हाडा अर्जांची छाननी करून आर्थिक निविदा खुली करण्यात येणार आहे. त्यानंतर विकासकाची नेमणूक केली जाईल. या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत रहिवाशांना 180 चौरस फूट घराच्या बदल्यात 450 चौरस फुटाचे घर मिळणार आहे.

अंधेरीची पीएमजीपी वसाहत 27,625 चौ.मी. क्षेत्रफळावर वसलेली आहे. 1990-92 दरम्यान पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत उभारलेल्या या वसाहतीत चारमजली 17 इमारती आहेत. या वसाहतीमध्ये 942 निवासी व 42 अनिवासी अशा एकूण 984 गाळेधारकांचे वास्तव्य आहे. संरचनात्मक अहवालानुसार या इमारती अत्यंत जीर्णावस्थेत आहेत. पावसाळय़ात येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. या वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी शिवसेना आमदार बाळा नर यांनी वारंवार म्हाडा आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. पीएमजीपी वसाहतींचा पुनर्विकास कंत्राटदाराची नेमणूक करून म्हाडाच्या माध्यमातून होणार असून हा प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा संकल्प आहे.