व्वा रे भाजपचे हिंदुत्व… महाराष्ट्राच्या महाउत्सवाआधी विघ्न, लालबागमध्ये गणेशभक्तांवर लाठीमार

हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या भाजप महायुती सरकारने रविवारी लालबागमध्ये गणरायांच्या आगमन सोहळ्यात गर्दी केलेल्या गणेशभक्तांवरच लाठ्या उगारल्या. परळ-लालबाग परिसरातील कार्यशाळांमधून एकाच वेळी 20 मोठ्या मंडळांचे बाप्पा मंडपाच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी पोलिसांचे नियोजन ढासळले आणि गणेशभक्तांच्या गर्दीत प्रचंड गोंधळ उडाला. भारतमाताजवळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. महाराष्ट्राचा महाउत्सव सुरू होण्याआधी उत्साहाला लाठीमाराचे गालबोट लागले. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आह

गणेशोत्सव अवघ्या तीन आठवडय़ांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मोठमोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा मंडपामध्ये दाखल होऊ लागले आहेत. रविवारी लालबाग, परळ, करी रोडचा परिसर बाप्पांच्या आगमन सोहळ्याने ‘फुल्ल’ भरला होता. दरवर्षीप्रमाणे भक्तांनी तुफान गर्दी केली होती. मात्र या गर्दीचे नियोजन करण्यात सरकारी यंत्रणा कमी पडल्या आणि पोलिसांनी लालबागमधील भारतमाता परिसरात गणेशभक्तांवर लाठीमार केला. भक्तांची संभाव्य मोठी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यादृष्टीने नियोजन करणे अपेक्षित होते. ते नियोजन ढासळल्याने गर्दीवर चेंगराचेंगरीसारखी स्थिती झाली. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आगमन सोहळ्यातील तरुण-तरुणींवर लाठ्या उगारल्या. सरकारी यंत्रणांना जर स्वतःला योग्य नियोजन करता येत नसेल तर त्याचा राग गणेशभक्तांवर का काढला जात आहे? हिंदुत्वाचा दिखावा करणारे सरकार हिंदूंच्याच सण-उत्सवामध्ये अशा प्रकारे वागत असेल तर त्यांच्याबाबत काय बोलायचे, अशा संतप्त प्रतिक्रिया गणेशभक्तांनी नोंदवल्या.

सोहळा उत्साहातच व्हावा!

मोठ्या गणेशमूर्तींचे आगमन रात्री 1 ते सकाळी 6पर्यंत करावे, अशी पोलिसांची भूमिका आहे. मात्र, या सोहळ्यात भाविकांनाही उत्साहाने सहभागी होता यावे, असे समन्वय समितीचे मत आहे. बुधवारी पोलीस आयुक्तांबरोबर होणाऱ्या बैठकीत समिती आपले म्हणणे मांडणार आहे, अशी माहिती समन्वय समितीचे सदस्य अमित कोकाटे यांनी दिली.

आगमन झालेले गणपती

मुंबई आणि मुंबईबाहेरील 20 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचे आज आगमन झाले. यात काळाचौकीचा महागणपती, खेतवाडीचा राजा, धारावीचा सुखकर्ता, पर्ह्टचा राजा, उपनगरचा लिटिल मास्टर, परळचा मोरया, मुंबईचा मोरया, कुर्ल्याचा महाराजा, सुंदरबागचा राजा, मालाडचा राजा, जिजामाता नगरचा विघ्नहर्ता, श्रीनगरचा महाराजा, उल्हासनगरचा विघ्नहर्ता, ईशान मुंबईचा राजा, सर्वोत्कर्षचा सुखकर्ता, सेव्हेन स्टार ग्रुप उल्हासनगर, कोल्हापूरचा चिंतामणी, सूरतचा विघ्नेश्वर, आराध्यराज सूरत, बलसाडचा सम्राट या मोठ्या गणपतींचा आगमन सोहळा आज झाला. दरम्यान, 10, 15, 17 आणि 24 ऑगस्टलाही मुंबई आणि मुंबईबाहेरच्या मोठ्या गणपतींचे आगमन होणार आहे.

श्रींच्या आगमनासाठी एकेरी व्यवस्था करावी!

ज्या प्रकारे गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी दिवशी गिरगाव चौपाटी आणि दादर चौपाटी येथे जाण्यासाठी प्रमुख मार्गिका एकेरी करून दुसऱ्या बाजूने केवळ गणेश विसर्जनासाठी मार्ग राखीव ठेवला जातो तशाच प्रकारे श्रींच्या आगमनासाठी वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक काsंडी तसेच भाविकांची गर्दीही टाळता येईल. त्याचबरोबर पोलिसांनी गणेश कारखान्याच्या आसपास परिसरात श्रींच्या आगमन सोहळ्यासाठी तात्पुरती नो-पार्ंकगची व्यवस्था केल्यास श्रींच्या मूर्ती नेणे सोपे होईल, अशी सूचना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे.

वाहतूक नियोजनही बोंबलले… चौफेर ‘जाम’

बाप्पांना मंडपात नेण्यासाठी परळ वर्कशॉप, लालबागमधील गणसंकुल येथे गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. परळ वर्कशॉपमधून सुरुवातीला ‘खेतवाडीचा राजा’ निघाला. त्यानंतर दुपारी 12 वाजता ‘काळाचौकीचा महागणपती’ आणि त्याच वेळी करी रोडमधील गणसंकुलातून ‘पर्ह्टचा राजा’ निघाला.

लोअर परळ, करी रोड, लालबाग, काळाचौकीतून येणाऱ्या साईबाबा पथ मार्गावरील रस्त्यांवरील वाहने जागोजागी अडकून पडली. चौफेर वाहतूक कोंडी झाली आणि गणेशभक्तांना धड उभे राहायलाही जागा राहिली नाही. वाहतुकीच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याने गणेशभक्तांना हा मनस्ताप सहन करावा लागला.