हुंडा, वारेमाप खर्च, प्री-वेडिंग शूट टाळा, मराठा समाजाची लग्नासाठी आचारसंहिता

लग्न समारंभातील वारेमाप खर्च टाळण्यासाठी मराठा समाजाने 20 कलमी आचारसंहिता तयार केली आहे. लग्न सोहळ्यावर जास्त खर्च करू नये, डीजे, प्री-वेडिंग शूट, हुंडा यांना फाटा द्यावा आणि पारंपरिक वाद्य, लोककलावंतांना संधी द्यावी, अशा अटी वधू-वर पक्षासाठी घालण्यात आल्या आहेत. रविवारी संत-महंतांच्या उपस्थितीत या आचारसंहितेची शपथ घेण्यात आली.

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हुंडा प्रथेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाने लग्न समारंभाबाबत नवीन नियमावली तयार करण्याचे ठरवले होते. त्यानुसार अहिल्यानगर येथे मराठा समाजाचे लग्न आचारसंहिता संमेलन पार पडले. यावेळी डोंगरगणचे जंगले महाराज शास्त्राr, देवगडचे भास्करगिरी महाराज, ‘पद्मश्री’ पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, उद्योजक एन. बी. धुमाळ, माजी आमदार साहेबराव दरेकर, किशोर मरकड, अशोक कुटे यांच्यासह मराठा समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत मराठा समाजातील मुला-मुलींच्या लग्न समारंभासाठी नवीन नियमावली तयार केली. लग्नानंतर हुंडय़ावरून वाद होऊ नयेत हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून 20 कलमी आचारसंहिता बनवली आहे. त्यात जाचक प्रथांवर बंदी घातली असून पारंपरिक वाद्ये आणि कलावंतांना संधी दिली आहे.

चांगल्या प्रथा-परंपरा जपणार – ह.भ.प. जंगले शास्त्री महाराज

लग्न समारंभांबरोबरच वाढदिवस आणि उद्घाटन कार्यक्रमांत पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख रक्कम स्वरूपात अहेर करावेत. तसेच लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या यांसारख्या वस्तू देण्यास मनाई केली आहे. चांगल्या प्रथा-परंपरा पुढे सुरू ठेवल्या पाहिजेत, मात्र काही लोक चुकीच्या प्रथा लग्न समारंभात घुसवत आहेत. ते टाळण्यासाठी आचारसंहिता बनवली आहे, असे ह.भ.प. जंगले शास्त्राr महाराज म्हणाले.

आचारसंहितेत काय आहे?

– लग्न सोहळ्यात डीजे, सत्कार, भाषणे या गोष्टींना फाटा द्यावा.
– लग्न सोहळा जास्तीत जास्त 500 लोकांच्या उपस्थितीत करावा.
– लग्नानंतर मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. मुलीला तिच्या आईने वारंवार पह्न कॉल करू नये.
– कर्ज काढून लग्नावर खर्च करू नये. नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्यांना पायबंद घालावा.
– वरमाला घालताना नवरा-नवरीला उचलू नये.
– लग्नात फक्त वधूपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत.