
अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पाच महिने उलटले तरी धनंजय मुंडे मलबार हिल येथील सातपुडा हा सरकारी बंगला सोडायला तयार नाहीत. स्वतःचे आजारपण आणि मुलीच्या शिक्षणाचे कारण देत मुंडे त्या बंगल्यात ठाण मांडून आहेत.
मुंडे बाहेर पडत नसल्याने विद्यमान अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना तिथे जाता येत नाही. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या खात्याबरोबरच सातपुडाही भुजबळ यांना देण्यात आला. पण मुंडे बाहेरच पडत नसल्याने भुजबळांची अडचण झाली आहे.
धनंजय मुंडे यांनी बीड येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारत 4 मार्च 2025 रोजी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मंत्रिपद सोडल्यानंतर नियमानुसार 15 दिवसांच्या आत शासकीय बंगला खाली करणे बंधनकारक आहे. मात्र पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी मुंडे यांनी मलबार हिल येथील सातपुडा बंगल्यातून आपले सामान हलवलेले नाही.
नियमानुसार दंड आकारताना शासकीय निवासस्थानाच्या क्षेत्रफळानुसार दंड आकारला जातो. सातपुडा बंगल्याचे क्षेत्रफळ 4,667 चौरस फूट आहे. प्रतिचौरस फूट 200 रुपये दंड आकारला जातो. त्यानुसार, मुंडे यांच्यावर दरमहा 9.33 लाख रुपये दंड आकारला जाऊ शकतो. ती रक्कम आतापर्यंत 46 लाख रुपयांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, मुंडे यांना बंगला खाली करण्यासाठी अद्याप कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नसल्याचे समजते.
मुंडेंकडून 46 लाखांचा दंड वसुल करा – दमानिया
मंत्रिपदी नसतानाही गेल्या पाच महिन्यांपासून शासकीय बंगला वापरल्याबद्दल धनंजय मुंडे यांच्याकडून नियमाप्रमाणे दंड वसूल करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंडे यांच्यावर आजतागायत 46 लाख रुपयांचा दंड बसतो. तो माफ करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो, पण मुख्यमंत्र्यांनी एक रुपयाचाही दंड माफ करु नये, अशी विनंती दमानिया यांनी एका व्हिडियोच्या माध्यमातून केली आहे. मुंडे स्वाभिमानी असते तर दोन बेडरूम किचनचे घर विकत घेऊन किंवा भाडयाने राहिले असते, असेही दमानिया यांनी म्हटले आहे.


























































