मुंबई-अहमदाबाद हायवेवरील वाहतूककोंडीने घेतला महिलेचा बळी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूककोंडीने आणखी एक बळी घेतला. अंगावर झाड कोसळलेल्या महिलेला मुंबईला घेऊन निघालेली रुग्णवाहिका वाहतूककोंडीत तब्बल चार तास अडकून पडली. वेळेत रुग्णालयात न पोहोचल्यामुळे उपचाराअभावी या महिलेचा मृत्यू झाला. छाया पुरव असे या महिलेचे नाव आहे. या महामार्गाकडे दुर्लक्ष करणारे सरकार आणखी किती बळी घेणार, असा सवाल करण्यात येत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून मुंबई-अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. सिमेंटचे रस्ते बनवण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. हे कामच प्रवाशांच्या जीवावर उठले आहे. या महामार्गावरील वाहतूककोंडी आणि खड्डय़ांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत.

सफाळे येथील मधुकरनगरात राहणाऱया छाया पुरव यांच्या अंगावर शनिवारी झाड कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात येत होते. परंतु मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणाऱया लेनवर सकाळपासूनच प्रचंड ट्रफिककोंडी झाली होती. त्यामुळे छाया पुरव यांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका तब्बल चार तास एकाच ठिकाणी अडकून पडली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. मुंबईला नेण्याऐवजी त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णावाहिका तातडीने मीरा-भाईंदर येथील ऑर्बिट हॉस्पीटलमध्ये नेली. परंतु तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.