
हॉकी इंडियाने ऑस्ट्रेलियात होणाऱया चार सामन्यांच्या मालिकेसाठी 24 सदस्यीय हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघाची सोमवारी घोषणा केली. हरमनप्रीत सिंग या संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. हा दौरा आगामी आशिया कपसाठी तयारीचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱया या दौऱयासाठी पूवन्ना सीबी या नव्या चेहऱयाचा संघात समावेश झाला आहे.
हिंदुस्थानी संघ 15 ते 21 ऑगस्टदरम्यान पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामने खेळणार आहे. हे सामने 29 ऑगस्टपासून बिहारमधील राजगीरमध्ये होणाऱया आशिया कप क्वालिफायरसाठी सराव म्हणून महत्त्वाचे ठरणार आहेत. 2026 मध्ये नेदरलँड आणि बेल्जियम येथे होणाऱया विश्वचषकासाठी पात्रता मिळविण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे.
संघातील गोलरक्षकाची जबाबदारी कृशन बी पाठक आणि सूरज करकेरा यांच्याकडे देण्यात आली आहे. संरक्षण विभागात हरमनप्रीत सिंगसह सुमित, जरमनप्रीत सिंग, संजय, अमित रोहिदास, नीलम संजीप सेस, जुगराज सिंग आणि नवोदित पूवन्ना यांचा समावेश आहे. मधल्या फळीत युवा राजिंदर सिंग याचा समावेश करण्यात आला असून, त्याची तुलना माजी कर्णधार सरदार सिंग यांच्याशी केली जाते. त्याच्यासोबत राजकुमार पाल, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, रबिचंद्र सिंह मोइरांगथम आणि विष्णुकांत सिंह यांच्यावर मिडफिल्डची धुरा असेल.
ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी हिंदुस्थानी संघ
गोलरक्षक ः कृशन बी पाठक, सूरज करकेरा.
डिफेंडर ः हरमनप्रीत सिंग (कर्णधार), सुमित, जरमनप्रीत सिंग, संजय, अमित रोहिदास, नीलम संजीप सेस, जुगराज सिंग, पूवन्ना सीबी.
मिडफिल्डर ः राजिंदर सिंग, राजकुमार पाल, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, रबिचंद्र सिंह मोइरांगथम, विष्णु कांत सिंह.
फॉरवर्ड ः मनदीप सिंग, शिलानंद लाकडा, अभिषेक, सुखजीत सिंग, दिलप्रीत सिंग, सेल्वम कार्ति, आदित्य लालागे.

























































