तेंडुलकर-अॅण्डरसन ट्रॉफी अॅशेसपेक्षा सरस, माजी फिरकीवीर अश्विनचा दावा

तेंडुलकर-अॅण्डरसन ट्रॉफीमध्ये पिछाडीवरून हिंदुस्थानने इंग्लंडविरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत रोखली. या कामगिरीने अनेक क्रिकेटप्रेमींच्या मनात 2005 मधील ऐतिहासिक ‘अॅशेस’ मालिकेच्या आठवणी जाग्या केल्या. मात्र हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने या मालिकेची 2005 च्या अॅशेस मालिकेपेक्षा सरस असल्याची ठाम भूमिका मांडली आहे.

2005 ची ‘अॅशेस’ मालिका ही दोन परिपूर्ण संघांमध्ये झाली होती. परंतु, तेंडुलकर-अॅण्डरसन ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांमध्ये अनेक कमतरता असूनही खेळाडूंनी त्या दूर करत ही मालिका प्रेक्षणीय बनवली. 25 दिवसांतील प्रत्येक क्षण क्रिकेट चाहत्यांसाठी सणासारखा ठरला, असे मत अश्विनने बोलून दाखवले.

2005 मध्ये इंग्लंडने तब्बल 18 वर्षांनंतर पहिल्यांदा ‘अॅशेस’ ट्रॉफी परत मिळवली होती. त्या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडे ग्लेन मॅग्रा, शेन वॉर्न, ब्रेट ली, जेसन गिलेस्पी यांसारखे दिग्गज गोलंदाज होते, तर इंग्लंडकडे अॅण्ड्रय़ू फ्लिंटॉफ, जेम्स अॅण्डरसन, स्टीव्ह हार्मिसनसारखा तूफानी गोलंदाजी ताफा. फलंदाजीतही रिकी पॉण्टिंग, मॅथ्यू हेडन, केविन पीटरसन, अॅडम गिलख्रिस्ट, डेमियन मार्टिन, मायकल क्लार्प यांसारख्या नावांमुळे ही मालिका अति उच्च दर्जाची मानली गेली होती.

याउलट अश्विनने तेंडुलकर-अॅण्डरसन ट्रॉफीतील दोन्ही संघांच्या अपूर्णतेवर प्रकाश टाकला. हिंदुस्थानकडे विराट कोहली, रोहित शर्मा व अश्विनसारखे अनुभवी खेळाडू नव्हते. तिसऱया क्रमांकासाठी साई सुदर्शन व करुण नायर यांना संधी देण्यात आली, मात्र दोघेही अपेक्षित प्रभाव टापू शकले नाहीत.

इंग्लंडकडेदेखील स्टुअर्ट ब्रॉड आणि अॅण्डरसन यांची अनुपस्थिती जाणवत होती. बेन स्टोक्स पूर्णतः तंदुरुस्त नव्हता. वेगवान गोलंदाजीत त्यांना जॉश टंग, गस अॅटकिंग्सन, ब्रायडन कार्स आणि ख्रिस वोक्स यांच्यावर अवलंबून राहावे लागले. चार वर्षांनंतर पुनरागमन करणारा जोफ्रा आर्चरही केवळ दोन कसोटींपुरता उपलब्ध होता.

हिंदुस्थानच्या मोहम्मद सिराज आणि प्ऱसिध पृष्णाकडून काही वेळा अनियमित मारा पाहायला मिळाला, तर इंग्लंडकडूनही गोलंदाजीत अस्थिरता दिसून आली. या सर्व मर्यादा असूनही खेळाडूंनी आपापल्या कमपुवत बाजूंवर काम करत एक अविस्मरणीय मालिका साकारली, असे मत अश्विनने व्यक्त केले. ‘कोणताही प्रेक्षक म्हणणार नाही की त्याचे पैसे वाया गेले. मी सामन्यातील एकही क्षण चुकवला नाही, असेच प्रत्येक क्रिकेटप्रेमी म्हणेल. त्यामुळेच ही मालिका 2005 च्या ‘अॅशेस’पेक्षा अधिक सरस मानली जावी लागेल,’ अश्विनने स्पष्टपणे नमूद केले.