
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला तरी घाटकोपर येथील रामजी आशर या शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्यांची हिंदीची परीक्षा घेण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला होता. पालकांच्या तक्रारीनंतर शिवसेनेने शाळेवर धडक देत व्यवस्थापनाला याप्रकरणी जाब विचारला. अखेर शाळा व्यवस्थापनाने हिंदीची परिक्षा रद्द करत नवे वेळापत्रक जारी केले आहे.
घाटकोपर पूर्वेला असलेल्या रामजी आशर (सी. डी. एम. भाटिया) या शाळेत तिसरीच्या विद्यार्थ्यांना सक्तीने हिंदी परीक्षा देण्यास सांगितले होते. याबाबत शाळेने विद्यार्थी व पालकांवर प्रचंड दबाव आणला. याप्रकरणी पालकांनी शिवसेनेकडे धाव घेत न्याय मिळवून देण्याची विनंती केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. निशा मोहनदास यांना जाब विचारला. आधीच तुमच्या शाळेत मराठी, इंग्रजी, गुजराती या तीन भाषेची सक्ती असताना आणखी चौथ्या म्हणजेच हिंदी भाषेची सक्ती कशाला हवी, असा सवाल केला. शाळा व्यवस्थापनाने आपली चूक मान्य करत नवीन वेळापत्रक जारी केले तसेच हिंदी भाषेची परीक्षा रद्द करत त्या परीक्षेचे गुण इतर दुसऱया परीक्षेत वळते केले जातील, असे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संघटक अशोक वंडेकर, प्रसाद कामतेकर, विधानसभा कार्यालय प्रमुख प्रकाश वाणी, उपविभागप्रमुख अजित गुजर, अजित भायजे, शाखाप्रमुख सुनील भोस्तेकर, नरेश माटे, सत्यवान कवळे, राम पाल, हृदयनाथ राणे, महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे सचिव सचिन भांगे, शाखा संघटक चंद्रकांत हळदणकर, संतोष पिंगळे, दिनकर मांडले आदी यावेळी उपस्थित होते.



























































