
>> प्रभाकर पवार, [email protected]
दयानंद बड्डा नायक ऊर्फ दया हा मेंगलोरच्या येन्नेहोळ या खेड्यातील कुडाच्या घरात वाढला. दयाचे दोन भाऊ मुंबईला. आईने दया व त्याच्या छोट्या बहिणीला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गावी वाढविले, मोठे केले. दयाचा मोठा भाऊ मुंबई ते गोवा बोटीवरच्या कँटीनमध्ये वेटरचे काम करायचा.
पगार झाला की, मुंबईतून तो मनीऑर्डरने गावी आईला पैसे पाठवायचा! लग्नासाठी त्याने दागिने व पैसेही साठवले होते. त्याने आईला मुलगी बघण्यासाठी सांगितले व गावी येण्याची तारीखही कळवली. आई, दया व त्याच्या बहिणीने एसटी स्टॅण्डवर सतत तीन दिवस वाट बघितली, परंतु दयाचा मोठा भाऊ काही गावी आला नाही. दया तेव्हा दहा-बारा वर्षांचा होता. भाऊ मुंबईत राहत होता, परंतु कुठे ते कुणालाच माहीत नव्हते. तेव्हा आई दयाला घेऊन मुंबईत आली. दाक्षिणात्य मुंबईकरांकडे तिने चौकशी केली, परंतु दयाच्या भावाचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. आई निराश होऊन पुन्हा गावी परतली. भावाच्या शोधासाठी तिने अल्पवयीन दयाला विनंती केली.
दया व त्याचा दुसरा मोठा भाऊ मुंबईत आले. अंधेरीच्या वर्सोवा भागात एका चहाच्या हॉटेलात या दोन्ही भावांनी नोकरी मिळवली. दया चहा पोहोचवायचे व कपबश्या धुवायचे काम करायचा. हे दोघेही भाऊ रात्री हॉटेलच्या बाहेर उघड्यावर झोपायचे. त्या वेळी रात्री दयाला आपल्या बेपत्ता मोठ्या भावाची स्वप्ने पडायची त्याच्या भावाची त्याच्या गावाजवळच्या काही जणांनी पैशांसाठी हत्या केली व प्रेत मुंबईच्या खाडीत फेकून दिले असे दयाला एक दिवस स्वप्न पडले. तो खडबडून जागा झाला व हे स्वप्न खरे ठरू नये अशी देवाकडे प्रार्थना करू लागला. आपल्याला पडलेल्या स्वप्नाची त्याने आपल्या जवळच्या लोकांकडे वाच्यता केली. तेव्हा त्यात तथ्य असल्याचे दयाला अनेकांनी सांगितले. तुझ्या भावाचा पैशांसाठी खून झाला आहे, असे काही जणांनी छातीठोकपणे सांगितले, परंतु पुरावा कुणाकडेच नव्हता. तेव्हा दया पार कोलमडून गेला. त्याने यातील काहीएक आईला सांगितले नाही. उलट त्याने पोलीस अधिकारी होऊन भावाच्या मारेकऱ्यांना शोधून काढण्याचा, पकडण्याचा निश्चय केला. गावात सातवी पास झालेल्या दयाने मुंबईतील गोरेगावच्या पहाडी हिल येथील कन्नड शाळेत प्रवेश घेतला. चहा पोहोचवता पोहोचवता तो दहावी पास झाला. त्यानंतर त्याने महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले. चहा पोहोचविणारा कपबश्या विसळणारा मुलगा पदवीधर झाला हे ऐकून वर्सोवा येथील कोळी बांधव माता-भगिनी खूश झाल्या. दयाचा उत्साह वाढला. त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फौजदारपदासाठी परीक्षा दिली. 1995 साली जेव्हा त्याची फौजदार म्हणून निवड झाली, तेव्हा वर्सोवामधील त्याच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी साऱ्या वर्सोव्यात पेढे वाटले.
नाशिकच्या पोलीस अकादमीत प्रशिक्षण पार पडल्यानंतर 1996 साली दयाची त्याच्या घराजवळच जुहू पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली. तेव्हा डॉ. सत्यपाल सिंह हे झोन नऊचे उपायुक्त होते. जुहू पोलीस ठाण्यात दया नायक यांनी आपल्या कामाची चमक दाखविल्यानंतर वर्षभराने डॉ. सत्यपाल सिंह यांनी दया नायक यांना आपल्या विशेष पथकात सामील करून घेतले. तेव्हापासून त्यांचा जो झंझावात सुरू झाला, तो सेवानिवृत्त होईपर्यंत थांबला नाही. गुंडांचा कर्दनकाळ म्हणूनच दया नायक यांनी आपली कारकीर्द सुरू केली. 1 जानेवारी 1997 रोजी छोटा राजन टोळीतील (डी. के. राव गट) दोन गुंडांना जुहू येथे चकमकीत कंठस्नान घालून दया नायक यांनी आपले एन्काऊंटर’चे खाते उघडले. शिवसेनेचे खासदार मोहन रावले यांच्या हत्येसाठी दादरच्या कोहिनूरजवळ फिल्डिंग लावणाऱ्या छोटा शकील टोळीतील सादिक काल्याबरोबर झालेल्या चकमकीत तर दया नायक गंभीर जखमी झाले, परंतु तरीही दया नायक डगमगले नाहीत. सादिक काल्याच्या छातीचा वेध घेऊनच ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी गंभीर जखमी झालेल्या दया नायकची रुग्णालयाला भेट देऊन प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली व त्यांच्या शौर्याचे कौतुक केले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त रॉनी मेन्डोन्सा यांनीही दया नायक यांची भेट घेऊन त्यांना शाबासकी दिली. अशा या धाडसी व लढवय्या अधिकाऱ्याने शंभरएक चकमकीत भाग घेतला. मुंबईतील गैंगवॉर व अंडरवर्ल्ड संपविण्यात दया नायक यांचा मोठा वाटा आहे. दया नायक यांचा मुंबई सोडा, अख्ख्या भारतात गवगवा आहे. त्यांना कुणी ओळखत नाही असा पोलीस भारतीय पोलीस दलात आढळून येणार नाही. दया नायक यांचे नाव ऐकले की, आजही नामचीन गुंड चळाचळा कापतात. दया नायक यांनी सुमारे एक हजाराच्या वर गुंड व अतिरेक्यांना जेरबंद केले आहे. ड्रग्ज माफियांचे कारखाने व त्यांच्या टोळ्या उद्ध्वस्त केल्या आहेत. असा हा तेजतर्रार अधिकारी आपल्या तीन दशकीय सेवेनंतर 31 जुलै रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून मुंबई क्राईम बॅचमधून पायउतार झाला, तेव्हा पोलीस दलातील अनेकांना गहिवरून आले.
मुंबईतील अंडरवर्ल्ड व अतिरेकी कारवायांना आळा घालणारे, संपविणारे मुंबई पोलीस दलातील बहुसंख्य अधिकारी सेवानिवृत्त झाले. दया नायक हा एकमेव आघाडीचा अधिकारी पोलीस दलात आपल्या कर्तृत्वावर आजपर्यंत टिकून होता. तोही निवृत्त झाल्याने मुंबई पोलीस दलात एक पोकळी निर्माण झाली आहे. दया नायक एसीपी म्हणून रिटायर्ड झाले, परंतु त्यांच्या नावाभोवती असलेले वलय आजही कायम आहे. त्यांची गाडी कुठेही थांबली तरी पोलीस दलातील या ‘हिरो’चे फोटो किंवा ‘सेल्फी’ घेण्यासाठी लोक त्यांच्या भोवती गर्दी करतात. असे भाग्य पोलीस दलात फार कमी लोकांना लाभले आहे. दया नायक पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करून रिटायर्ड झाले, परंतु गुंडांचे कर्दनकाळ ठरलेले दया नायक आपल्या मोठ्या भावाच्या मारेकऱ्यांना जंग जंग पछाडूनही शोधू शकले नाहीत, याची मात्र त्यांना आजही सल… खंत आहे.