मुख्यमंत्री आणि गद्दारनाथांमधील अहंकाराच्या युद्धाचा त्रास महाराष्ट्राने का सहन करावा? आदित्य ठाकरे यांचा सवाल

बेस्ट महाव्यवस्थापक पदासाठी अतिरिक्त कार्यभार मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) दोन अतिरिक्त अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याने गोंधळ वाढल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्टचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याकडून आशिष शर्मा यांची त्याच पदावर नेमणूक केली. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला जोरदार फटकारले आहे.

”राज्य सरकार जाणूनबुजून बेस्टला मारून टाकत आहे, पण त्याहून वाईट म्हणजे मुख्यमंत्री आणि गद्दरनाथ मिंधे यांच्यातील समन्वय आधीच संपला आहे.मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये एका पोस्टसाठी एका अधिकाऱ्याच्या नावाचे आदेश जारी केले आहेत, तर गद्दारनाथांच्या शहर विकास विभागाने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाचे आदेश जारी केले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली नाही का? मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितल्या बदल्यांशी संबंधित विभागाने हे आदेश द्यायला नको होते का? मुख्यमंत्री आणि गद्दारनाथांमधील अहंकाराच्या युद्धाचा त्रास महाराष्ट्राने का सहन करावा?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला केला आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, ”जर मुख्यमंत्री आणि गद्दरनाथ मिंधे यांच्यातील बेसिक संवादच मेला असेल, तर हे असे लोक आपल्या राज्याचे नेतृत्व करणार आहेत? हे महाराष्ट्राने पाहिलेले सर्वात भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकार आहे.