
राजस्थानमधील कन्हैयालाल हत्याकांड प्रकरणावर आधारित ‘उदयपूर फाइल्स’ हा चित्रपट कायदेशीर लढाईनंतर अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झालेला आहे. न्यायालयीन लढाईनंतर केंद्र सरकारने 8 ऑगस्टला उदयपूर फाइल्स विजय राज यांच्या चित्रपटाला मंजुरी दिली आहे. ‘उदयपूर फाइल्स’ या चित्रपटावरील दीर्घ वादानंतर अखेर चित्रपटाला प्रदर्शनासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटावरील आक्षेप फेटाळून लावत त्याच्या प्रदर्शनावरील बंदी उठवली आहे. या चित्रपटाची चर्चा गेले कित्येक दिवस होती.
मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.
कन्हैयालाल यांच्या मुलाने केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘उदयपूर फाइल्स: कन्हैयालाल टेलर मर्डर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मान्यता दिल्याबद्दल कन्हैयालाल यांचे पुत्र यश साहू म्हणाले, 8 ऑगस्टला संपूर्ण देश माझ्या वडिलांचे काय झाले ते पाहेल. आमच्या कुटुंबाचे दुःख या चित्रपटात स्पष्टपणे दिसून येते, माझ्या वडिलांची हत्या कशी झाली.
या चित्रपटाबाबत सुरुवातीपासूनच वाद होता. यापूर्वी तो 11 जुलैला प्रदर्शित होणार होता. परंतु काही धार्मिक संघटना आणि एका आरोपीने दिल्ली उच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल केली होती.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अलिकडेच एक आदेश जारी केला आहे. या आदेशांतर्गत सीबीएफसी (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) ने चित्रपटाला विहित प्रक्रियेनुसार प्रमाणपत्र दिले आहे. निर्मात्याने या चित्रपटामध्ये 55 दृश्यांवर कात्री लावली आहे.
चित्रपटाला प्रदर्शनासाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर, निर्माता अमित जानी यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेची घोषणा करणारा एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून ते म्हणाले की, आम्ही शक्य तितक्या संतुलित आणि संवेदनशील पद्धतीने चित्रपट सादर केला आहे. आमचा उद्देश कोणत्याही समुदायाला लक्ष्य करणे नाही तर घटना दाखवणे आहे.
‘उदपूर फाइल्स’मध्ये विजय राज मुख्य भूमिका साकारत आहेत. चित्रपटाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. 2022 मध्ये घडलेल्या एका खून प्रकरणावर आधारित आहे ज्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते.