मिंधे गटाच्या आणखी एका आमदाराचा भ्रष्टाचार समोर, आमश्या पाडवींनी घेतले पत्नी व मुलाच्या नावे सरकारी घरकुल

संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यानंतर मिंधे गटाचा आणखी एक आमदार वादाच्या भोवऱयात सापडला आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवा येथील आमदार आमश्या पाडवी यांनी पत्नी व मुलाच्या नावे सरकारी घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार गावीत यांनी केला आहे. पाडवी यांच्या पत्नीच्या नावावर बंगले व घर असतानाही त्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेऊन सरकारचीच फसवणूक केल्याचे गावित यांनी म्हटले आहे.

भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना विजयकुमार गावीत यांनी हा आरोप केला. मिंधे गटाचे आमदार आमश्या पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर गावीत यावेळी तुटून पडले. आमश्या पाडवी यांच्या कुटुंबावर गावीत यांनी यावेळी गंभीर आरोप केले.

चंद्या आणि आमश्याची मस्ती जिरवणार

चंद्या आणि आमश्या हे दोघेही माझे टार्गेट आहेत, असा एकेरी उल्लेख करत गावीत यांनी मिंध्यांची मस्ती जिरवण्याचा इशारा दिल्याने नंदुरबारमधील वातावरण तापले आहे. मिंधे गटानेही गावीत यांना प्रत्युत्तर दिले आहे. गावीत परिवाराने विधानसभेत बंडखोरी करून नंदुरबारच्या चारही मतदारसंघांमध्ये स्वतःच्या कुटुंबातील उमेदवार उभे केले होते, तसेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनाही न जुमानता काँग्रेससोबत हातमिळवणी करत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती, असा आरोप आमदार रघुवंशी यांनी केला आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपूर्वीच भाजप आणि मिंधे गटातील वाद चव्हाटय़ावर आला आहे.