गुरु दत्त उत्तम खवैय्ये आणि स्वयंपाकी होते; नातीने जागवल्या आजोबांच्या रंजक आठवणी

गुरु दत्तची जन्मशताब्दी सध्या आपण साजरी करत आहोत. यावेळी गुरु दत्त यांच्या नातींनी त्यांच्या खूप आठवणींना उजाळा दिला. गुरु दत्त यांचे दिवंगत पुत्र अरुण दत्त यांच्या मुली करुणा आणि गौरी स्वतः चित्रपट निर्मात्या आहेत. तसेच त्यांनी एका दशकाहून अधिक काळ सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. गुरु दत्त यांच्या नातींनी एनडीटीव्ही सोबत त्यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणतात, एक काळ असा होता जेव्हा आम्हाला एमटीव्ही पाहण्याचीही परवानगी नव्हती.

गुरु दत्त हे स्वतः उत्तम खवैय्ये होते. त्यांना खाण्यामध्ये खासकरुन मसालेदार पदार्थ आवडत असल्याचे त्यांच्या नातींनी सांगितले. कुटुंबासाठी स्वयंपाक करायलाही त्यांना खूप आवडत असे. त्यांना गोड पदार्थही तितकेच प्रिय होते. शूटिंगमधून पॅकअप झाल्यानंतर, अनेकदा त्यांच्या क्रू मधील सदस्यांना ते मिठाई खायला घालत असत अशी माहिती त्यांच्या नातीने दिली. तसेच त्यांचे प्राणीप्रेमही खूप होते ते आजतागायत आमच्या घरात पिढ्यानपिढ्या सुरु आहे.

बॉलीवूडचे महान अभिनेते आणि दिग्दर्शक गुरु दत्त यांनी चित्रपट जगताला अनेक उत्तम क्लासिक चित्रपट दिले. आजही जगभरातील चित्रपट निर्माते आणि चित्रपट प्रेमींना प्रेरणा देते. गुरु दत्त यांचे निधन अनेक दशकांपूर्वी झाले होते, परंतु त्यांचा वारसा त्यांच्या कामातून जिवंत आहे. गुरु दत्त यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त ऑगस्टमध्ये त्यांचे चित्रपट सिनेमा हॉलमध्ये दाखवले जाणार आहेत. 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान, गुरु दत्त यांचे सर्वोत्तम चित्रपट हिंदुस्थानातील 250 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये दाखवले जातील. या चित्रपटांमध्ये प्यासा, आर-पार, चौधवी का चांद, साहेब बीवी और गुलाम, कागज के फूल, मिस्टर अँड मिसेस 55 आणि बाज या चित्रपटाचा समावेश आहे.