
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 14 वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाही. त्यातच निकृष्ट कामामुळे नवाकोरा काँक्रीट रस्ताही दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यात जात असून बदललेल्या बांधकाम मंत्र्यांनीही दौऱ्याचा फार्स करत अधिकाऱ्यांसह फोटोसेशन केले आहे. त्यामुळे गणपती आले आणि मंत्री जागे झाले अशी टीका होऊ लागली आहे. दरम्यान, सरकारच्या या ढिसाळ कारभाराने चाकरमान्यांच्या नशिबी तोच रस्ता, तेच खड्डे, तेच जीवघेणे अपघात अशी भयंकर परिस्थिती आली असल्याने नरकयातनांच्या या विघ्नाचे कधी विसर्जन होणार, असा सवाल कोकणवासीयांनी केला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम 2011 मध्ये सुरू झाले. मात्र 14 वर्षे पूर्ण होऊनही महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. सध्या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे ठिकठिकाणी खडी रस्त्यावर पसरली आहे. काही खड्डे तर एक फूट खोलीचे आहेत. या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता अतिशय धोकादायक झाला आहे. काही ठिकाणी साईडपट्टीच नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. खड्ड्यांच्या या दुरवस्थाविरोधात नागरिकांच्या संतापाचा स्फोट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी महामार्गाचा पाहणी दौरा केला. यावेळी नॅशनल हायवे अॅथॉरिटीचे अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सहभागी झाले होते.
अंतिम तारीख सांगण्याचे टाळले
पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होते. यामुळे गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांचे दौरे सुरू होतात. यावेळी खड्डे भरण्याच्या सूचना करण्यात येतात. यावर्षीसुद्धा हा सिलसिला सुरू झाला असून, गणेशोत्सवाला केवळ 20 दिवस शिल्लक राहिले असल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. तसेच महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होईल याबाबत अंतिम तारीख जाहीर करणे त्यांनी टाळले. महामार्गाचे काम करणाऱ्या काही एजन्सी चांगल्या नव्हत्या तर काही ठिकाणी जमिनी संपादनामुळे कामे अडली होती अशी कबुली देतानाच बांधकाम मंत्र्यांनी माणगाव, इंदापूर येथील टेंडर प्रक्रिया राबविण्यास उशीर झाल्याने येथील कामे पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याची माहिती दिली.