
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वाल्हे ते पिसुर्टी फाट्यादरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा प्रशासनालाच विसर पडल्याने या भागातील रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक ठरणार आहे.महर्षी वाल्मीक ऋषी यांची तपोभूमी म्हणून वाल्हे गावची ओळख आहे. परंतु नव्याने झालेल्या पालखी महामार्गामुळे वाल्हे गावची ओळखच प्रवाशांसह पर्यटकांसाठी पुसटशी होऊ लागली आहे.
या पालखी महामार्गावरील वाल्हे गावचा बसथांबा गायब झाला असून, गावात येणाऱ्या पर्यायी रस्त्यालादेखील पाण्याच्या टाकीसह अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. त्यातच महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनांची वेग मर्यादा वाढली असताना, रस्त्यालगत असणाऱ्या महर्षी वाल्मीकी विद्यालयाजवळ बॅरिकेडिंग दिशादर्शक फलक तसेच गतिरोधकांचा अभाव असल्याने येथील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
दातेवाडीसह वागदरवाडी राख नावळी या ठिकाणच्या नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील दळणवळणाच्या दृष्टीने नाईलाजास्तव विरुद्ध रस्त्याचा आसरा घ्यावा लागत आहे. येथील भुयारी मार्गाजवळील पाण्याच्या मोरीवर असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कठडेच नसल्याने भीषण अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने कामे तत्काळ पूर्ण करावीत; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे रमेश गणगे यांनी दिला आहे.