वेब न्यूज – जिवंतपणी अंत्ययात्रा

<<< स्पायडरमॅन >>>

आपल्या हिंदुस्थानात अनेक चित्रविचित्र परंपरा आणि मान्यता आपल्याला आढळून येतात. एखाद्या आनंदाच्या प्रसंगी, दुःखात त्या दिसतात, पण एखाद्या संकटावर मात करण्यासाठी वापरलेले विविध तोडगेदेखील विचित्र असतात. यातल्या काही तोडग्यांना हसावे की रडावे, हेच कळत नाही. अशाच एका विचित्र तोडग्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक प्रेतयात्रा जाताना दिसत आहे. प्रेतयात्रेमध्ये अनेक लोक सहभागी झालेले आहेत आणि ते मोठ्या आवाजात ‘रघुपती राघव राजाराम…’सारखी भजनेदेखील गात आहेत. काही लोक दुःखद प्रसंगी वाजवतात तसे ढोल वाजवतानादेखील दिसतात. व्हिडीओ बघताना आपल्यालादेखील मृत माणसाविषयी भावना दाटून येतात, पण ही अंत्ययात्रा कोणा मृत व्यक्तीची नसून एका जिवंत माणसाची आहे हे कळल्यावर आपल्याला धक्का बसतो.

ही विचित्र अंत्ययात्रा मध्य प्रदेशातील बडवानी जिह्यातील तलून गावच्या लोकांनी काढली होती. अशी अंत्ययात्रा काढण्याचे कारण होते ते म्हणजे इंद्रदेवाला खूश करणे. इंद्रदेव खूश झाला की, पाऊस पाडणार अशी या गावकऱ्यांची ठाम धारणा. गावात या वर्षी फार कमी पाऊस झाला. प्यायला पाणी नाही, शेतीसाठीदेखील पाणी नाही. डोळ्यांसमोर पिके जळताना पाहून इथले शेतकरी विमनस्क अवस्थेला पोहोचले. आधी गावात यज्ञ करण्यात आला, जेवणावळी झाली, मंत्रतंत्रदेखील वापरून पाहण्यात आले. मात्र कोणत्याही उपायाने यश येत नाही हे बघता इथल्या गावकऱ्यांनी वर्षानुवर्षांच्या मान्यतेला वापरून बघायचे ठरवले आणि ती म्हणजे जिवंत माणसाची अंत्ययात्रा काढणे.

गावातील भिलट देव मंदिरापासून रात्री 11 वाजता या अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. गावातून फिरवून ही अंत्ययात्रा शेवटी चिंदी बोर नावाच्या स्थानावर नेण्यात आली आणि तिथे परंपरेप्रमाणे एका पुतळ्याचे प्रेत म्हणून दहन करण्यात आले. त्यानंतर ज्या व्यक्तीची ही अंत्ययात्रा काढण्यात आली होती, त्या व्यक्तीच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.