सगळे प्रयत्न संपल्यावर जनता आठवते! भागवतांचा रोख मोदींवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात 75 वर्षांचे होत आहेत. तेव्हा त्यांनी थांबावे, असा अप्रत्यक्ष सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला होता. त्यानंतर भागवत यांनी आज आणखी एक सूचक विधान केले. ‘सगळे प्रयत्न संपल्यावर जनता आठवते. जनतेच्या मनात असेल तर एखाद्याचा हेतू साध्यही होतो ’, असे भागवत म्हणाले. त्यांचा रोख मोदींकडे होता.

‘इतकी वर्षे कष्ट घेतले. आता जरा बरे दिवस आले आहेत तर आम्हालाही काही मिळायला हवे, असे काही लोकांच्या मनात येत असेल पण हा भाव सोडा. मला काही नको अशी सद्वृत्ती हवी. त्यागाचं जीवन हवं’, असा सल्लाही त्यांनी ‘अच्छे दिन’वाल्यांना दिला.

हावरटपणामुळे संकटं

मोहन भागवत यांनी भगवान शंकराचा दाखला देत हावरटपणा सोडण्याचा उपदेश दिला. ज्याच्यापासून सामान्यजनांना धोका आहे ते आम्ही अंगावर घेतो, असं जीवन जगायची आवश्यकता आहे, असे भागवत म्हणाले. माणसाच्या हावरटपणामुळेच आज संकटं येत आहेत, असे नमूद करताना ही प्रवृत्ती आणि कट्टरपणामुळे राग, द्वेष वाढत चालला आहे. लढाया, युद्ध होत आहेत, असे भागवत म्हणाले.