
>> संजीव साबडे
चायनीज स्टॉलवरील व्हेज फ्राईड राईस, चाऊमीन, व्हेज मंचुरियन, चिली चिकन, चायजीन भेळ हे पदार्थ तुलनेने परवडणारे, पोटभरीचे असले तरी शेझवान सॉस, अजिनोमोटोमुळे वापरून झणझणीत केले जातात. वाफवलेल्या मोमोजमध्ये मैदा वापरला जातो. हे सारंच आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे. जिभेची हौस भागवताना आरोग्याबाबतही तितकेच सजग राहायला हवे.
मुंबईत व परिसरात कुठे कोणते खाद्यपदार्थ चांगले मिळतात, अमूक एक पदार्थ तमूक ठिकाणीच का खावा, हे या सदरात लिहिलं जात असतं. त्यात मराठी, दक्षिणी, पंजाबी, गुजराती, मुघलाई, पारसी, इराणी, गोवन अशा सर्व खाद्यपदार्थांचा उल्लेख व वैशिष्टय़े असतात. काही वेळा चायनीज, मेक्सिकन, जपानी, थाई आदी पदार्थांविषयीही माहिती असते. या वेळीस मात्र हल्ली खूप लोकप्रिय असलेल्या खाद्यपदार्थांपासून सावध का राहायला हवं, याची माहिती आहे. शाळकरी मुलं आणि तरुण ते अधिक खातात. ते खाल्ल्यास अपाय होऊ शकतो, हेही माहीत हवं.
आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी मुंबईत रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडील खाद्यपदार्थ खाल्ला असेलच. अनेक नोकरदार स्त्राr-पुरुष असलं काही सटरफटर खाण्याऐवजी ऑफिसजवळच्या स्टॉलवर दुपारी राईस प्लेट वा पोळी भाजी खातात. सकाळी पोहे, उपमा, इडली, मेदूवडा, डोसा वा उत्तप्पा किंवा वडा, सामोसा हा असंख्य मुंबईकरांचा नाश्ता असतो. दुपारी अल्प उत्पन्न गटातील अनेक जण चायनीज स्टॉलवर व्हेज फ्राईड राईस किंवा चाऊमीन म्हणजे नूडल्स खाताना दिसतात. हे पदार्थ तुलनेने स्वस्त, परवडणारे आणि तरीही पोटभरीचे. क्वचित फ्राईड राईस वा नूडल्समध्ये चिकन वा अंडं असतं. कधी तरी व्हेज वा नॉन व्हेज मंचुरियन वा चिली चिकन.
सर्व चायनीज पदार्थांत अत्यंत तिखट शेझवान सॉस, चिली सॉस आणि सोबतीला सोया सॉस व टोमॅटो सॉस असतो. शेझवानमुळे पदार्थ तिखट व झणझणीत होतो. त्यावर पाणी जास्त प्यायलं जातं आणि त्यामुळे पोट गच्च होतं. हे सारे पदार्थ चमचमीत व्हावेत म्हणून त्यात अजिनोमोटो नावाचा खडे मिठासारखा प्रकार घातला जातो. त्यामुळे पदार्थ खूप छान लागतात. अजिनोमोटो म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट. हे एक प्रकारचं रसायन आहे. म्हणजे ग्लुटामीक अॅसिडचे सोडियम मीठ. आंबट, गोड, तिखट वा तुरटपेक्षा याची चव वेगळी, स्वाद वेगळा. शिवाय वेगवेगळ्या सॉसमध्येही ते असतेच.
अजिनोमोटो हा प्रकार खाण्यात थोडा व क्वचित असेल तर ठीक, पण रस्त्यांवरील चायनीज खाद्यपदार्थांत त्याचं प्रमाण अधिक असतं. अधिक अजिनोमोटो अपायकारक, पण स्वाद, चवीसाठी त्याचा सर्रास वापर होतो. स्टॉलवर चायनीज खाताना त्यात अजिनोमोटो आहे का नाही, हे कोणीच विचारत नाही. प्रत्येकाला ती चमचमीत व झणझणीत चव व स्वादच हवा असतो. सर्व चायनीज पदार्थ आणि सोबतच्या सॉसमधून अजिनोमोटो सतत आपल्या पोटात जात असते. चांगल्या रेस्टॉरंटमध्ये ते वापरत नाही किंवा खूप कमी वापरलं जातं, पण स्वस्त चायनीज पदार्थांच्या रस्त्यावरील स्टॉलवर फ्राईड राईस, नूडल्स, मंचुरियन, चिली चिकन, चिकन लॉलीपॉप या सर्व प्रकारांत अजिनोमोटोचं प्रमाण बऱयाचदा अधिक असतं. त्यामुळे ते पदार्थ नेहमी खाल्ल्यास छातीत जळजळणं, मळमळणं, डोकेदुखी, ओकारी, रक्तदाब वाढणं आदी त्रास सुरू होतात.
सर्व खाऊगल्ल्या आणि रस्त्यांवरील स्टॉलवर सतत गर्दी दिसते. दुपारनंतर चायनीज भेळ, व्हेज वा नॉन व्हेज ड्राय मंचुरियन, चिकन लॉलीपॉप, ड्राय चिली चिकन खाणाऱयांचं प्रमाण अधिक असतं. त्यापैकी सुकी चायनीज भेळ व व्हेज ड्राय मंचुरियन खूपच स्वस्त असतं. त्यामुळे शाळा, कॉलेज सुटल्यानंतर घरी निघालेली शाळकरी वा कॉलेजतली मुलं त्यावर ताव मारताना दिसतात. हे दोन्ही प्रकार साधारणपणे 20 ते 40 रुपयांना मिळतात. खरं तर त्या पदार्थांचा लालभडक रंग पाहूनच भीती वाटायला हवी, पण ही मुलं आणि अल्प उत्पन्न असलेले कामगार व तरुण नेमकं तेच खात असतात. ती भेळ मुळात तिखट असते, पण त्यावर आणखी शेझवान सॉस घालून ते खातात. काही जण ग्रेव्ही असलेलं मंचुरियन खात असतात. त्या ग्रेव्हीचा रंगही रक्तासारखा लाल असतो.
मुळात नूडल्स मैद्याची असतात, तळलेली असतात. त्यात थोडा कोबी, गाजर व कांद्याची पात वगळता काहीच शरीरासाठी फायदेशीर नसतं. केवळ वडापाव किंवा सँडविच, पोहे यापेक्षा ही चायनीज भेळ स्वस्त असते, एवढाच विचार अतिशय अपायकारक आहे. मंचुरियन ग्रेव्हीसाठी, गोल गोळे बनवताना मैदा आणि मक्याचं पीठ हे दोन्ही वापरलं जातं. शिवाय तिखट जाळ शेझवान सॉस व अजिनोमोटो असतोच. मैदा व मक्याच्या पिठामुळे हळूहळू पोटाचे विकार होतात, हे पचायला जड असतात, शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं, काहींना मक्याच्या पिठामुळे त्वचेवर पुरळ येते आणि अनेकांचा रक्तदाबही वाढतो. वरळी नाक्यावरील एका स्टॉलवर हे खायला झुंबडच उडालेली असते. मुलं व पालक एकत्रच ही भेळ वा मंचुरियन खात असतात. जे चिली चिकन वा व्हेज चिली खातात, त्यातही मक्याचं पीठ वापरलं जातं. हे पदार्थ खाऊ नयेत असं नव्हे, पण रोज वा नियमितपणे खाणं योग्य नाही.
चायनीज प्रकार खूप तिखट, झणझणीत असल्याने हल्ली तरुण वर्ग संध्याकाळ होताच रस्त्यांवरील मोमोच्या स्टॉलसमोर उभा दिसतो. हे मोमोज अत्यंत सौम्य प्रवृत्तीचे. ते उकडून तळले नाहीत, तर अधिकच बरे. कारण त्यात तेलाचा अंशही नसतो. मोदक वा करंजीसारख्या मोमोमध्ये भाज्या, चिकन वा पनीर असतं. ते 50 ते 100 रुपये प्लेट असतात, पण बहुतेक सर्व जण त्यासोबत भरपूर शेझवान सॉस घेतात आणि खातात. तिबेटमधून आलेल्या या पदार्थाचे आवरण मैद्याचे असते. त्यामुळे ते हलके वाटतात, पण ते खाल्ल्याने अॅसिडिटी, अपचन, पोटदुखी होते. मोमोमध्ये भाज्या वा चिकन कमी आणि मैदाचं फार असतो. एक वेळ तांदळाच्या वा गव्हाच्या पिठाचे मोमो चालतील, पण मैदा शक्यतो नकोच.
असे हे पदार्थ शरीरासाठी अत्यंत अपायकारक. केवळ जिभेची चव भागवावी म्हणून अशा पदार्थांच्या वाटेला जाणं स्वतलाच अपाय करून घेण्यासारखे आहे.