
कर्मचाऱयाच्या निधनानंतर त्याच्या भावाला अनुकंपा नोकरी मिळू शकते की नाही, असा मुद्दा उच्च न्यायालयात उपस्थित झाला. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) ही अनुकंपा नोकरी नाकारली होती. कॅटचा हा निर्णय न्यायालयाने रद्द केला. या प्रकरणी नव्याने निकाल देण्याचे आदेश न्यायालयाने कॅटला दिले.
न्या. मकरंद कर्णिक व न्या. एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. निधन झालेल्या कर्मचाऱयावर त्याचा भाऊ निर्भर होता याचा कोणताही पुरावा नाही, या कारणासाठी अनुकंपा नोकरीचा दावा नाकारणे अयोग्य आहे, असे नमूद करत न्यायालयाने वरील आदेश दिले.
काय आहे प्रकरण…
4 ऑक्टोबर 2012 रोजी अतीश रसे यांच्या भावाचे निधन झाले. त्याची रेल्वेतील नोकरी अनुकंपा म्हणून मिळावी, असा अर्ज केला. याच्या चौकशीसाठी वेल्फेअर अधिकाऱयाची नियुक्ती केली. अर्जदार त्या कर्मचाऱयावर अवलंबून होता का, तशी कागदोपत्री नोंद आहे की नाही याची शहानिशा करावी, असे रेल्वेचे परिपत्रक आहे. या चौकशीनुसार अतीश त्यांच्या भावावर अवलंबून नसल्याचा अहवाल वेल्फेअर अधिकाऱयाने दिला. त्याची नोंद करून घेत कॅटने अतीश यांचा दावा नाकारला. त्याविरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती.
अन्य मुद्दय़ांचा विचार करा
अतीश यांचे कुटुंब आर्थिकदृष्टय़ा कमकुवत झाले आहे. अतीश यांचा दावा ग्राह्य धरण्यासारखा आहे, असेही वेल्फेअर अधिकाऱयाने नमूद केले आहे. यासह अन्य मुद्दय़ांचा विचार करून कॅटने नव्याने निर्णय द्यायला हवा, असेही खंडपीठाने सांगितले आहे.