
आयसीआयसीआय बँकेने मिनिमम बॅलन्सची रक्कम 50 हजार केल्यानंतर ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सोशल मीडियावर तर जोरदार संताप व्यक्त होत आहे. ही तर लूट आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत.
आयसीआयसीआय बँकेने केलेली वाढ ही भेदभाव दर्शविणारी आहे अशी टीका अनेकांनी केली आहे, तर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आरबीआयला आवाहन करत या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. हे नवे निकष मध्यम आणि कनिष्ठ उत्पन्न गटातील खातेधारकांसाठी अडचणीचे ठरू शकतात, असेही काही जणांचे म्हणणे आहे. बँकेने मासिक शिल्लक रकमेसाठी जे निकष ठेवले आहेत, ते देशातील कर्मचाऱ्यांच्या सरासरी मासिक उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षाही अधिक आहेत असे काहींचे म्हणणे आहे, तर काही वापरकर्त्यांनी बँकेवर श्रीमंत खातेधारकांना प्राधान्य दिल्याचा आरोप करत खाते बंद करण्याची धमकी दिली आहे.