इंदिरा आवास अधिकारी बनून पोलिसांची आरोपीवर झडप, 14 वर्षांनंतर आरोपीला तेलंगणात पकडले

सशस्त्र दरोडय़ाच्या गुह्यातील आरोपी 14 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत लपून राहत होता. एकदा सापळा रचूनही तो हाती लागला नव्हता. अखेर आरोपी तेलंगणामध्ये एका गावात राहत असल्याचे कळताच पोलिसांनी इंदिरा आवास अधिकारी बनून तेथून त्याला उचलले.  

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात वर्ष 2011 मध्ये सशस्त्र दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुह्यातील आरोपी आनंद संगी (38) हा तेव्हापासून पसार झाला होता. तो कोणाच्याच संपका&त नसल्याने त्याचा शोध घेणे कठीण बनले होते. अखेर आनंद गेल्या काही महिन्यांपासून तेलंगणा येथील मरायला या गावामध्ये असल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक अजीज शेख व त्यांच्या  पथकाने  तेलंगणा गाठले. तिथे गेल्यावर आनंद गावाबाहेरील जंगलात इंदिरा आवास योजनेतून मिळालेल्या घरात राहत असल्याचे समजले. त्यानुसार शेख व त्यांचे पथक इंदिरा आवास अधिकारी बनून त्याच्या घरावर धडकले. घरात आनंद भेटताच त्याला ताब्यात घेतले. त्याला पकडून मुंबईत आणल्यानंतर अटक करण्यात आली. 

भाईंदर येथे चकवा दिला 

एका वर्षापूर्वी आनंद मीरा–भाईंदर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता, परंतु तो पोलिसांना चकवा देत तिथून पळून गेला होता. अखेर 14 वर्षांनंतर तो पोलिसांच्या हाती लागला.