आता तरुणांना संधी मिळाली पाहिजे असे म्हणत, आनंद शर्मा यांनी दिला काँग्रेसच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचा राजीनामा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सांगितले की विभागाची पुनर्रचना करण्यासाठी आणि तरुणांना नेतृत्व करण्याची संधी देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जवळजवळ एका दशकापासून या विभागाचे प्रमुख असलेले आनंद शर्मा म्हणतात की, विभागात आशादायक आणि प्रतिभावान तरुण नेत्यांचा समावेश केल्याने त्यांच्या कामकाजात सातत्य राहील.

पीटीआयच्या वृत्तानुसार, त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आणि या जबाबदारीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले.

आनंद शर्मा हे काँग्रेस कार्यकारिणी (CWC) चे सदस्य आहेत. त्यांनी हिंदुस्थान -अमेरिका अणु करारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अणु पुरवठादार गटात हिंदुस्थानला सूट मिळवून दिली आणि हिंदुस्थान-आफ्रिका भागीदारीला एक संरचित स्वरूप दिले.

मुंबई 26/11 हल्ल्यानंतरही त्यांनी जागतिक व्यासपीठांवर हिंदुस्थानची बाजू जोरदारपणे मांडली होती. काँग्रेसने जाहीर केलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नेतृत्वाखाली, DFA ने लोकशाही मूल्ये आणि मानवी हक्कांवर विश्वास ठेवणाऱ्या जगातील सर्व पक्षांशी मजबूत संबंध निर्माण केले.

मनीष तिवारी यांनी X वर लिहिले – “परराष्ट्र व्यवहारांबद्दलची त्यांची समज खोलवर आहे, विशेषतः आफ्रिकेबद्दल. त्यांच्या अनुभवाचा आम्हाला नेहमीच फायदा झाला आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील साडेपाच दशके काँग्रेसच्या सेवेत घालवली आहेत.”

आनंद शर्मा अजूनही काँग्रेसमध्येच राहतील, परंतु DFA ची कमान आता एका तरुण नेत्याच्या हातात जाईल. ऑपरेशन सिंदूरवर भारताचे मत मांडण्यासाठी परदेशात गेलेल्या बहुपक्षीय संसदीय शिष्टमंडळांचाही ते एक भाग होते.