
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे. शिक्षण आणि उपचार हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत असे त्यांनी नुकतेच इंदूरमधील कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शिक्षण आणि आरोग्य सुविधांच्या महागड्या किमतीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, हे दोन्ही आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. पूर्वी या दोन्ही सेवा मानल्या जात होत्या, परंतु आता त्या पूर्णपणे व्यावसायिक बनल्या आहेत. भागवत यांनी हिंदुस्थानच्या शिक्षण व्यवस्थेचे वर्णन ‘ट्रिलियन डॉलर्सचा व्यवसाय’ असे केले आणि सुधारणांची गरज यावर भर दिला.
अधिक बोलताना भागवत म्हणाले, ‘ज्ञानाच्या युगात शिक्षण खूप महत्वाचे आहे, यासाठी माणूस आपले घर विकेल, परंतु तो आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे, आरोग्यासाठी देखील एखादी व्यक्ती आपली संपूर्ण बचत गुंतवण्यास तयार असते. जेणेकरून त्याला चांगल्या ठिकाणी उपचार मिळतील. ते म्हणाले की, समाजात सर्वात जास्त गरज असलेली गोष्ट म्हणजे शिक्षण आणि आरोग्य. दुर्दैवाने आज या दोन्ही सुविधा स्वस्त नाहीत आणि सहज उपलब्ध नाहीत.
संघ प्रमुख म्हणाले की शाळा आणि रुग्णालये वाढत नाहीत असे म्हणता येणार नाही, उलट त्यांची संख्या सतत वाढत आहे. परंतु हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. कारण पूर्वी शिक्षण आणि आरोग्य हे सेवेचे काम मानले जात होते. आता त्याला व्यवसायाचे स्वरूप देण्यात आले आहे. शिक्षण आणि आरोग्य हे व्यवसाय बनले की ते सामान्य माणसाच्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडे जातात याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.