पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांचे सूचक ट्विट

बिहारमधील मतदार यादीच्या पुनरचना (SIR) आणि कथित ‘मत चोरी’ विरोधात सोमवारी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, सपा प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना ताब्यात घेतले.

संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या नेत्यांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही समावेश आहे. याशिवाय लोकसभा आणि राज्यसभेतील अनेक खासदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या तरी हा मोर्चा थांबला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनाही पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले.

यावेळी खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत, अटक! असे म्हटले आहे. संसद मार्ग पोलिस स्टेशनमध्ये या सर्व खासदारांना घेऊन जाण्यात आले होते. खासदारांचा मोर्चा रोखण्यात आला तेव्हा, अखिलेश यादव बॅरिकेड्सवरून उडी मारून गेले. याशिवाय राहुल गांधी पोलिसांच्या बसमधूनच गर्जना करत म्हणाले की, आमचा लढा सुरूच राहील! आमचा लढा राजकीय नाही तर संविधान वाचवण्यासाठी आहे.

मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी, अखिलेश यादव, प्रियांका गांधी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यादरम्यान राहुल गांधी म्हणाले की आम्हाला बोलूही दिले जात नाही. विरोधी पक्षाच्या खासदारांचे म्हणणे आहे की, ते निवडणूक कार्यालयात जात होते, परंतु त्यापूर्वीच त्यांना थांबवण्यात आले. यानंतर, त्यांना बसमध्ये नेण्यात आले. त्यांना सध्या संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.