लेख – युवा शक्तीला विधायक वळण देणे आवश्यक

>> दिलीप देशपांडे

युवा शब्दातच वायू म्हणजे गती आहे. स्वामी विवेकानंद यांना संस्कारक्षम, कणखर, राष्ट्राप्रति, समाजाप्रति प्रेम असणारा निर्व्यसनी युवक अपेक्षित होता. युवा दिन साजरा करताना या सर्व गोष्टींचा विचार सर्वांनी करायला हवा. शासनाने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा आहे. नवीन संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. हाच त्यावर एकमेव उपाय आहे. घरी बसल्या बसल्या बेरोजगारी भत्ता देण्याची योजना न आखता सरकारने बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणे महत्त्वाचे आहे.

आज एकूण राजकीय परिस्थिती बघितली तर सैरभैर झालेली आहे. सत्तेसाठी राजकारण कसे सुरू आहे हे आपण बघतच आहोत आणि त्यात बेरोजगारी, वाढती व्यसनाधीनता हे युवकांसमोरचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. मात्र ते बाजूला पडत आहेत. जसा शिक्षित युवक आहे त्याच्या समोर नोकरीचा प्रश्न आहे, तसेच जो शिक्षित नाही परंतु शेती या फार मोठय़ा व्यवसायात गुंतलेला आहे त्याच्या डोळ्यांसमोर शेती पिकवणे आणि ती टिकवून ठेवणे यातच तो गुरफटला आहे.

देशाच्या प्रगतीचे सुकाणू युवकांच्या हाती आहे असे म्हटले जाते. भारत हा जगातील सगळ्यात मोठा युवकांचा देश आहे. भारतात पासष्ट टक्के युवकांची संख्या आहे, असे म्हटले जाते. युवापिढीच्या क्षमतेवर, ताकदीवर भारतही जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. आजच्या परिस्थितीत युवा पिढीत नवीन शिकण्याची आवडही आहे, आणि जिद्ददेखील. देशाच्या विकासात त्यांचा सहभाग आहे. मात्र सगळीच युवाशक्ती या श्रेणीत बसत नाही. ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.

जागतिक स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक युवा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. युवकांशी निगडित काही विषयांवर चर्चा घडवून आणली जाते. लिब्सन येथे 8 ते 12 ऑगस्ट 1998 मध्ये पार पडलेल्या युवकांशी निगडित मंत्र्यांच्या परिषदेत 12 ऑगस्ट ‘जागतिक युवा दिवस’ साजरा करण्याची शिफारस केली गेली आणि त्यावर 17 डिसेंबर 1999 रोजी संयुक्त राष्ट्र महाससभेने शिक्कामोर्तब केले तेव्हापासून 12 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक युवा दिवस’ म्हणून साजरा होतो. युवा दिवस साजरा करत असताना युवकांशी निगडित काही विषय, प्रश्नांची शासकीय आणि युवा पातळीवर चर्चा होणे आवश्यक वाटते.

युवक आणि विद्यार्थी संघटना, युवक आणि राजकीय संघटना, युवक आणि सोशल मीडिया, युवक आणि राजकारण, युवक आणि सामाजिक जाणिवा व जबाबदारी, युवक आणि शेती व्यवसाय यासंबंधित प्रश्न जाणून घ्यायला हवेत.

आजचा युवक इंटरनेट, मोबाईल, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सऍप अशा सोशल मीडियाच्या जाळ्यात नको तितका अडकला आहे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. हवा तेवढा उपयोग न करता, नको तेवढा दुरुपयोग केला जातो. त्यामुळे फार मोठय़ा प्रमाणात युवक त्यात अडकून आत्ममग्न झालाय. चुकीचे दिशेने वापर होतोय. कलाकार, खेळाडू, सेलिब्रेटींना मोठय़ा रकमेचा मोबदला देऊन ऑनलाईन गेमच्या जाहिराती केल्या जातात व तरुणांना आकर्षित केले जाते. हे गेम म्हणजे एक जुगारच असतो. तरुणांना विधायक कार्याकडे ओढण्याऐवजी हे असले प्रकार तरुण पिढीची दिशा बदलून टाकत आहेत. त्यांच्या भोवती अशा गेमचा विळखा घातला गेला आहे व त्यात तरुण पिढी बरबाद होत आहे. या गोष्टीकडे गंभीरपणे बघितले गेले पाहिजे आणि अशा प्रकारांवर बंदी आणायला हवी आहे. अनेक राज्यांत यावर बंदी आहे. सरकारला त्याची आवश्यकता वाटत नाही का? युवकांच्या विकासाच्या योजनांचा विचार करत असताना अशा गोष्टींकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

संवाद कमी होतोय, वाचन कमी झालेय. काही वेळेला युवकांमध्ये वैचारिक क्षीणता आल्याचे जाणवते. नवीन तंत्रज्ञान मिळतेय, सगळे जग जवळ आलेय, पण माणसे हरवली आहेत. मीडियाचा योग्य वापर करण्याची समज नाही. म्हणून वाटते युवा शक्तीला विधायक वळण द्यायला हवे. अनेकांचे आयुष्य दिशाहीन झाले आहे. कारण कुठल्या न कुठल्या निवडणुका असतातच. रोजगार नसलेला युवक यात गुरफटला आहे. आंदोलन, मोर्चे याकामीच त्यांचा फक्त वापर वर्षानुवर्षे करून घेतला जातोय ही गंभीर बाब आहे. त्यातच त्याच्या सामाजिक जाणिवा लोप पावत आहेत. समाजातला अत्याचार, भ्रष्टाचाराबद्दल त्याला काही घेणे-देणे नाही. तो पेटून उठत नाही. त्यांच्या जाणिवा बोथट झाल्या आहेत. घरातल्या घरात खुनाचे प्रकार घडतात. कुठून आली आहे ही अस्वस्थता? रोजगार नसल्याने फार मोठ्या संख्येने युवक अस्वस्थ आहेत. ज्या ठिकाणी संधी उपलब्ध असते, तिथे पोहोचत नाही किंवा टिकाव लागत नाही. तरुणांना वैचारिक क्षीणता यायला लागलीय. ते धूम्रपान, मद्यपानाचे आहारी जात आहेत. गुटख्यावर बंदी असूनही अनेक ठिकाणी लाखोंच्या संख्येने साठा पकडला जातो. बार, पब, क्लबमध्ये युवा पिढी गुरफटत आहे. ड्रग्ज, अमली पदार्थ सेवन वाढते आहे. त्यामुळे युवा पिढी बरबाद होतेय याकडे दुर्लक्ष होते आहे.

युवा शक्तीत खूप सामर्थ्य नक्कीच आहे. स्वामी विवेकानंदाच्या जयंतीलाही राष्ट्रीय युवा दिवस साजरा करतो. त्यांना युवा शक्तीवर खूप विश्वास होता. युवा शब्दातच वायू म्हणजे गती आहे. स्वामी विवेकानंद यांना संस्कारक्षम, कणखर, राष्ट्राप्रति, समाजाप्रति प्रेम असणारा निर्व्यसनी युवक अपेक्षित होता. युवा दिन साजरा करताना या सर्व गोष्टींचा विचार सर्वांनी करायला हवा. शासनाने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा आहे. नवीन संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. हाच त्यावर एकमेव उपाय आहे. घरी बसल्या बसल्या बेरोजगारी भत्ता देण्याची योजना न आखता सरकारने बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणे महत्त्वाचे आहे. नाहीतर राष्ट्राची ताकद म्हणून ज्या युवकांकडे आपण पाहतो, ती युवा पिढी राजकारण, सोशल मीडिया आणि व्यसनाच्या फेऱयात बरबाद होईल. भारत हा बेरोजगार, व्यसनाधीन युवकांचा देश व्हायला वेळ लागणार नाही. काही युवक संघटना नक्कीच चांगले कार्य करत आहेत, असतील तरी ते खूप तोकडे आहेत.