फेसबुक फ्रेंडने मित्राची कार ‘ओएलएक्स’ वर टाकली; नोटिफिकेशन आल्याने ऑनलाइन विक्रीचा डाव उधळला

फेसबुकवर मैत्री करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. भामट्या फेसबुक फ्रेंडने ओळखीचा फायदा घेत तक्रारदार मित्राची कार चालवण्यासाठी मागितली आणि त्याला कोणतीही पूर्वसूचना न देता ती कार परस्पर विक्रीसाठी ओएलएक्स अॅपवर पोस्ट केली. मात्र तरुणाच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आले SBB आणि भामट्यांचा ऑनलाइन कार विक्रीचा डाव उधळला. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी पप्पू दामोर आणि सलीम शेख या दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धारावी येथे राहणाऱ्या पप्पू दामोर याने तक्रारदार यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर भामट्यांनी तरुणाला मैत्रीच्या जाळ्यात फासले. त्याचा विश्वास संपादन झाल्यानंतर भामट्यांनी तरुणाकडे त्याची गाडी चालवण्यासाठी मागितली. तो गाडी देण्यास तयार झाल्यानंतर सलीम शेख हा गाडीची चावी घेण्यासाठी तरुणाच्या घरी गेला. सलीमने तरुणाला बॉबी राजू कुंचीकोरवे नावाचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅनकार्ड दाखवले आणि गाडी घेऊन फरार झाला.

काही दिवसांनंतर तरुणाने भामट्यांशी संपर्क करून गाडी परत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र या भामट्यांनी त्याला कोणतेही उत्तर दिले नाही. दरम्यान या भामट्यांनी ती गाडी परस्पर ऑनलाइन अॅपद्वारे विक्रीसाठी ठेवली. याबाबत माहिती मिळताच तरुणाने दोघांविरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

चार महिलांची सुटका

नवी मुंबई – मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना चालवणाऱ्या उलव्यातील हॅपी फिगर स्पावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून चार महिलांची सुटका केली. स्पाची मालकीण जयश्री पटेल हिला अटक करण्यात आली आहे. जयश्रीला न्यायालयात हजर केले असता तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.

दुकली गजाआड

पनवेल – पनवेलजवळील मुंबई एक्स्प्रेस रोडवर उभ्या असलेल्या ट्रकमधून लाखोंचा मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. झायेद फारुकी आणि कैस राईन अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून फॅब्रिक रोल्सचे 3 बॉक्स, कॉफी पावडरचे 35 बॉक्स असा एकूण 2 लाख 82 हजारांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.