
पतीशी झालेल्या भांडणाचा राग एका महिलेने आपल्या पोटच्या गोळ्यावर काढला आणि त्याला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. यात दीड वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधील हापूर जिल्ह्यात कोतवाली पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या मजीदपुरा मोहल्ला येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिची कसून चौकशी सुरू आहे. ‘दैनिक जागरण‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मजीदपुरा मोहल्ल्यातील सातव्या गल्लीत राहणाऱ्या वसीम याचे पाच वर्षांपूर्वी बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील लरैई गावात राहणाऱ्या शबाना नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. तीन वर्षाच्या समद आणि दीड वर्षाच्या आहद या मुलांसोबत हे दाम्पत्य राहत होते. वसीम भंगाराचा व्यवसाय करत होता. दुमजली घराच्या पहिल्या मजल्यावर वसीमची आई परवीन आणि भाऊ दानिश रहायचा.
शबाना छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या भांडण करायची असा आरोप वसीमने केला आहे. सोमवारी दुपारीही दोघांमध्ये भांडण झाले आणि रागाच्या भरात शबानाने दीड वर्षाच्या आहदला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. या घटनेनंतर घरात आरडाओरडा झाला आणि वसीमची आई, भाऊ यांच्यासह गल्लीतील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या आहदला स्थानिक रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर मुलाचे वडील वसीम यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आणि पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी महिलेला अटक केली. तसेच या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. सध्या या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे नगर कोतवाली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मुनीश प्रताप सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, पत्नी शबानाने याआधीही मुलाला फरशीवर जोरात आपटले होते, असा आरोप वसीमने केला. तसेच दीड वर्षांपूर्वीही पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले होते आणि त्यावेळी पत्नीने आपल्यावर उकळते दूध फेकले होते, असा आरोपही वसीमने केला आहे. या घटनेवेळी मोठा मुलगा समदचा चेहरा भाजला होता, असा दावाही वसीमने केला.