ताडदेवचा राजा सांगणार अवयवदानाचे महत्त्व, निघणार जनजागृती मिरवणूक; दहा दिवस अर्ज भरून देणार

ताडदेवचा राजा यंदा 86व्या वर्षात पदार्पण करत असून मंडळाने दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. यंदाही अवयवदानाबद्दल जनजागृती उपक्रम मंडळ राबवणार असून त्यासाठी 31 ऑगस्ट रोजी जनजागृती मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच 10 दिवस मंडपात बसून मंडळाचे कार्यकर्ते आरोग्य विभागाच्या संकेतस्थळाद्वारे अवयवदान करू इच्छिणाऱयांचे अर्ज भरून घेणार आहेत.

कोरोना काळात मंडळाने क्वारंटाईन सेंटर उभारले होते तसेच अर्ध्या किमतीत गरजूंना औषधे उपलब्ध करून दिली होती. लहान बालकांना मोफत उपचार असे अनेक सामाजिक उपक्रम मंडळाने राबवले. यंदा अवयवदानाचा संकल्प मंडळाने केला असून समाजात जनजागृती करून अवयवदानाच्या माध्यमातून गरजूंना त्यांच्या व्यंगावर मात करणे शक्य होणार आहे. त्यामुळे या उपक्रमाला मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद देण्याचे आवाहन मंडळाचे मुख्य विश्वस्त सिद्धेश माणगावकर यांनी केले आहे. यंदा बाप्पाच्या आगमनादरम्यानही कार्यकर्त्यांनी अवयवदानाचा संदेश देणारे फलक झळकवून जनजागृती केली.

स्क्रीन, फलकाद्वारे जनजागृती

31 ऑगस्ट रोजी निघणाऱया रॅलीत अवयवदानाचे महत्त्व सांगणारे फलक तसेच स्क्रीनही लावण्यात येणार आहेत. त्याद्वारे विविध सेलिब्रिटी लोकांना अवयवदान करण्याचे आवाहन करणार आहेत. तसेच टी-शर्टवरही अवयवदानाचा संदेश देण्यात येणार आहे. हा उपक्रम लोकोपयोगी असल्यामुळे सेलिब्रिटी पुठल्याही प्रकारचे शुल्क न घेता जनजागृती मोहिमेत सहभाग घेणार आहेत, अशी माहिती सिद्धेश माणगावकर यांनी दिली. दरम्यान, 31 ऑगस्ट रोजी निघणाऱया जनजागृती मिरवणुकीत विविध क्षेत्रांतील मान्यवर, गणेश भक्त, स्थानिक रहिवाशी, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत.