धोकादायक ठरवून पालिका शाळा बंद करण्याचे षड्यंत्र, सरकार आणि बिल्डरांचे साटेलोटे; कुलाबा, माहीममधील चार हजार विद्यार्थी हवालदिल

महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या टिकवण्यासाठी पालिकेची एकीकडे कसरत होत असताना सरकार आणि बिल्डरांच्या साटेलोटय़ामुळे शाळा धोकादायक ठरवून बंद करण्याचे षड्यंत्र सध्या सुरू आहे. यामध्ये कुलाबा आणि माहीममधील पालिकेच्या शाळांना पालिकेने धोकादायक असल्याची नोटीस बजावून शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे तब्बल चार हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे कुलाबा, माहीममध्ये पालिका शाळांचे अस्तित्वच राहणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

कुलाबा येथील म्युनिसिपल पब्लिक स्कूल आणि न्यू माहीम पब्लिक स्कूल या शाळांना पालिका प्रशासनाकडून धोकादायक ठरवून नोटीस बजावण्यात आली आहे. या दोन्ही शाळांमध्ये प्रत्येकी सुमारे दोन हजार विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळांमध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात कुलाबा शाळेतील विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी जागा उपलब्ध झाली नसल्याने ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. यामध्ये गोरगरीब, सर्वसामान्यांच्या घरात दोन ते तीन मुलांना एकच स्मार्टफोन मिळत असल्याने गैरसोय होत आहे. शिवाय त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत पालिकेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. या शाळांच्या दुरुस्तीसाठी गेल्या काही महिन्यांत कोट्यवधींचा खर्च करण्यात आला असताना आता अचानक या शाळा धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. या शाळांच्या जागा बिल्डर मित्रांच्या घशात घालण्यासाठीच धोकादायक ठरवल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.