एकतर्फी प्रेमातून तरुणीला धमकावणारा आशिक गजाआड

एकतर्फी प्रेमातून तरुणीला धमकावून तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या तयारीत एक गुन्हेगार होता. पण याबाबत वेळीच माहिती मिळताच कांजूरमार्ग पोलिसांनी कसून शोधमोहीम राबवून त्या तरुणाला उचलले.

रोहित खरात (25) असे त्या मजनूचे नाव आहे. तो सुष्मिता (नाव बदललेले) या तरुणीवर एकतर्फी प्रेम करायचा. परंतु सुष्मिता त्याला झिडकारत होती. तू माझी झाली नाहीस तर तुला सोडणार नाही असे त्याने धमकावले होते. त्यामुळे मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून रोहितविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रोहित त्या तरुणीवर हल्ला करणार असल्याची माहिती उपनिरीक्षक ओमासे यांना मिळाली. त्यानुसार कांजुरमार्गचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ओमासे, बोराडे, सांगळे, शेलार, वरपुटे, आसवले या पथकाने सलग 18 तास कसून शोध घेत रोहितला पकडले.