
श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिराकडे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या दर्शन मार्गावरील पायऱ्यांवर उभारण्यात आलेले निवारा शेड सध्या शेवटची घटका मोजत असून, कघीही कोसळून जीवितहानी अथवा वित्तहानी होऊ शकते. याबाबत वारंवार श्रावण यात्रा, महाशिवरात्री यात्रा यादरम्यान नियोजन बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव येथील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मात्र, संबंधित अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यातील एकमेव असलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी श्रावण यात्रा, त्रिपुरारी पौर्णिमा, महाशिवरात्री या काळात देशभरातून लाखो भाविक व पर्यटक पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी येतात. इतर दिवशीही हजारोंच्या संख्येने येत आहेत; परंतु या तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दर्शनबारी मार्गावरील पायऱ्यांवर उभारण्यात आलेले निवारा शेड पडू नयेत यासाठी त्याला खालून पायऱ्यांवरून आधार दिलेला आहे.
निवारा शेडला ठिकठिकाणी भगदाडे पडली असून, मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती लागली आहे. यामुळे पावसाळ्यात भाविकांना जीव धोक्यात घालून या धोकादायक शेडखाली तीन ते चार तास उभे राहावे लागत आहे. यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली तर याची जबाबदारी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार का? असा प्रश्न ग्रामस्थ, भाविक उपस्थित करीत आहेत. पायऱ्यांवरील गटारीतून मातीमिश्रित पाणी वाहत असल्याने संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे. मंदिर परिसर आणि पायऱ्यांजवळील अतिक्रमणांमुळे दुकानांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे भाविकांना ये-जा करण्यास अडचणी येत आहेत.
श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिराकडे जाण्यासाठी व येण्यासाठी एकमेव पायरी मार्ग असल्याने अन् मंदिराच्या बाजूने व पायरी मार्ग यांच्या दुतर्फा अतिक्रमणांचा विळखा आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडून व्यवस्थित लक्ष देऊन काम चांगले करून घेणे अपेक्षित असताना अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.