
नापास झाल्याने आई-बाबा मारतील अशी भीती तिला वाटत होती.. याच भीतीतून तिने बांगलादेशातील आपले घर सोडले आणि हिंदुस्थान गाठले. मात्र तिचा हा निर्णय नरकाहून भयंकर यातना देणारा ठरला. कोलकाता, गुजरात आणि त्यानंतर मायानगरी मुंबई गाठताना १२ वर्षांच्या या चिमुकलीवर तीन महिन्यांत तब्बल २०० वेळा लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नराधमांनी या मुलीला चटके देतानाच हार्मोन्स वाढवण्याचे इंजेक्शनदेखील दिले. वसईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर पीडितेची आपबिती ऐकल्यानंतर पोलीसही अक्षरशः हादरून गेले. याप्रकरणी चार बांगलादेशींसह नऊ नराधमांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
२६ जुलै रोजी नायगाव पूर्वेच्या स्टार सिटी येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी एक्सोडस रोड इंडिया फाऊंडेशन आणि हार्मोनी फाऊंडेशन यांच्या मदतीने १२ वर्षांच्या बांगलादेशी चिमुकलीची सुटका केली आहे. तिच्यावर गुजरात, नाडीयाड यासह अन्य ठिकाणी तीन महिन्यांत २०० हून अधिक नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी मोहम्मद बापरी (३३), जुबेर शेख (३८), शमिम सरदार (३९), रुबी खालिद (२१) या चार बांगलादशी तसेच उज्जल कुंडू (३५), परवीन कुंडू (३२) यांना अटक केली आहे. प्रीतीबेन मोहिडा (३७) आणि निकेत पटेल (३५) हे गुजरातचे दलाल आहेत. सोहेल शेख (२३) हा दलाल अहिल्यानगरचा आहे.
दलालांनी बोगस आधारकार्ड बनवून २१ वय दाखवले
खेळण्या-बागडण्याचे वय असलेल्या या निरागस मुलीवर अत्याचार करण्यासाठी तिला हार्मोन्स वाढवण्याचे इंजेक्शन देण्यात आले. इतकेच नाहीतर कारवाई होऊ नये याकरिता दलालांनी चक्क बोगस आधारकार्ड बनवून त्यावर तिचे वय २१ इतके दाखवण्यात आले आहे. नायगाव पोलिसांनी याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तपास पथक रवाना
परराज्यातही या मुलीवर अनेक ठिकाणी अत्याचार करण्यात आले आहेत. त्यादृष्टीने तपास सुरू असून पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. यातून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. मिम नावाच्या दलाल महिलेने पीडित मुलीला बांगलादेशातून हिंदुस्थानात आणले होते.