भिवंडीच्या खार्डी गावात दुहेरी हत्याकांड, व्यावसायिक वादातून हत्या

व्यावसायिक वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडाने भिवंडी तालुका मंगळवारी हादरून गेला. खारबाव चिंचोटी मार्गावरील खार्डी गावात दोघा तरुणांवर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या केली. प्रफुल्ल तांगडी व तेजस तांगडी अशी हल्ल्यात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

सोमवारी रात्री प्रफुल्ल आपला सहकारी तेजस हा खार्डी गावातील घरापासून काही अंतरावर असलेल्या जेडीटी इंटरप्रायसेस या आपल्या कार्यालयात बसला होता. रात्री ११ वाजता दोघे घरी जाण्यासाठी निघत असतानाच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी प्राणघातक शस्त्रांसह हल्ला केला. या हल्ल्यात घाव वर्मी बसल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच गतप्राण झाले.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर तेथे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी धाव घेतली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

१२ हल्लेखोरांविरोधात गुन्हा

प्रफुल्ल तांगडी यांचा चुलतभाऊ उमेश तांगडी याने दिलेल्या तक्रारीवरून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात विकी म्हात्रे, कल्पेश वैती, अजय तांगडी, महेंद्र तांगडी, दयानंद तांगडी, सुनील भोईर, प्रसाद तांगडी, मोहन तांगडी, नऊस नांदुरकर, विजय मुकादम, रवींद्र मुकादम व जितेश गवळी अशा १२ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.