
जालन्यामध्ये एका 21 वर्षीय तरुणीचा मध्यरात्री दोन वाजता संशयास्पद मृत्यू झाला आणि तिच्या कुटुंबियांनी पहाटे चार वाजता तिचा परस्पर अंत्यविधी उरकून टाकला. अर्पिता वाघ असे मुलीचे नाव असून हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी मयत तरुणीच्या वडिलांसह दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मयत मुलीचा परस्पर अंत्यविधी केल्याबाबत वेगळा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील अर्पिता वाघ हिचा मध्यरात्री 2 वाजता मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी भल्या पहाटे चार वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सकाळी स्मशानभूमीत धाव घेतली तेव्हा मृतदेह जळत होता.
पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्याप्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू असून या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली.