DRDO च्या गेस्ट हाऊसमधील मॅनेजरला अटक, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी केल्याचा आरोप

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी राजस्थानच्या सीआयडीने जैसलमेर येथे ही कारवाई केली. महेंद्र प्रसाद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

महेंद्र प्रसाद हा जैसलमेर येथून चांदण फिल्ड रेंजजवळील डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये कंत्राटी पद्धतीने मॅनेजर पदावर कार्यरत होता. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता. सैन्य आणि देशासंबंधीची संवेदनशील माहिती आयएसआयला तो पाठवत होता. या प्रकरणी त्याला आता अटक करण्यात आली असून 13 ऑगस्टला त्याला न्यायालयात हजर केले जाईल.

जयपूरचे पोलीस महानिरीक्षक डॉ. विष्णूकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या सीआयडी पथक देशविरोधी कारवाया करणाऱ्यांवर लक्ष ठेऊन आहे. या दरम्यान डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये मॅनेजर म्हणून काम करणारा महेंद्र प्रसाद (मूळ रा. उत्तराखंड) पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात असल्याचे समोर आले.

पाकिस्तानी एजंटला तो क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्र चाचणीसाठी फायरिंग रेंजला भेट देणाऱ्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांची आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या हालचालींची गुप्त माहिती पुरवत होता. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याचा फोनही जप्त करण्यात आला. फोनची तांत्रिक तपासणी केली असता तो डीआरडीओ आणि सैन्याशी संबंधिक गुप्त माहिती आयएसआयला पुरवत असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुप्तता कायदा, 1923 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.