बारामुल्लामध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळला, परिसरात शोधमोहीम सुरू

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळून लावले आहेत. चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. बारामुल्ला, उरी सारख्या भागात शोध मोहीम सुरू आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्कतेच्या स्थितीत काम करत आहेत. स्वातंत्र्यदिनी सीमावर्ती भागात नियंत्रण रेषेवर लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. यादरम्यान लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. सध्या सैन्याकडून शोध मोहीम सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील चिरुंडा गावात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. सुरक्षा दलांनी वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला. दहशतवादी आणि सैन्यातील चकमकीत एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. सध्या चकमक सुरू आहे. सैन्याने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि शोध मोहीम सुरू केली आहे.

गेल्या एका आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात अनेक चकमकी पाहायला मिळाल्या आहेत. आठवड्यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड, कठुआ, बारामुल्ला येथे 3 ठिकाणी चकमकी झाल्या. बारामुल्लाच्या चक टप्पर क्रीरी पट्टन भागात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना ठार मारले. त्यावेळी लष्कराने दारूगोळा देखील जप्त केला आहे. गेल्या आठवड्यात 2 सैनिक शहीद झाले होते आणि 2 सैनिक जखमी झाले होते. जम्मू-काश्मीर परिसरात एका आठवड्यातील ही दुसरी मोठी घटना आहे.