
उत्तर प्रदेशमध्ये औरैया येथे बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी चुलत भावाने सकाळी अल्पवयीन बहिणीकडून आधी राखी बांधून घेतली आणि रात्री तिच्यावरच लैंगिक अत्याचार करत खून केला. या प्रकरणी पोलिसांनी 33 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सुरजीत असे नराधमाचे नाव आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी सुरजीत काकांच्या घरी गेला आणि 14 वर्षाच्या अल्पवयीन बहिणीकडून त्याने राखी बांधून घेतली. त्या रात्री आरोपीने भरपूर दारू ढोसली आणि बहिणीवरच बलात्कार केला. हे गैरकृत्य समोर येऊ नये म्हणून आरोपीने पीडितेचा खून केला आणि तिचा मृतदेह फासावर लटकवत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस घरी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. घटनास्थळी पोलिसांना रक्ताचे डाग आढळल्यानंतर हा आत्महत्येचा प्रकार नसल्याचे समोर आले. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी कुटुंबातील सदस्यांना बोलू न देता सुरजीत सर्व प्रश्नांना उत्तरे देत होता.
अखेर पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनामध्ये पीडितेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सुरजीत याला ताब्यात घेतले आणि पोलीस खाक्या दाखवला. पोलीस चौकशी दरम्यान सुरजीतने गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, ही घटना घडली तेव्हा पीडितेची आई आणि दोन बहिणी नोएडा येथे भावाच्या घरी गेले होते. तर पीडितेचे वडील घराबाहेर झोपले होते. याचा फायदा उठवत आरोपीने आठवीत शिकणाऱ्या चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. वडील सकाळी उठले तेव्हा मुलीने गळफास घेतल्याचे समोर आले. तिच्या कपड्यांवर खून आणि मानेवर खुणा होत्या. याचा आधार घेत पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीचे गैरकृत्य समोर आले.