
श्रीमंतीसाठी आणि विकसीत गाव म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाची जगभरात ख्याती आहे. हिवरे बाजार गावाने पाणलोट क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे देश-विदेशातील लोकं या गावाला भेट देऊन त्याची माहिती घेत असतात. आता यामध्ये अमेरिकेतील नेब्रास्का युनिव्हर्सिटी आणि IIT भुवनेश्वर येथील शास्त्रज्ञांची भर पडली आहे. यांनी हिवरे बाजार पाणलोट क्षेत्राला भेट देऊन कार्बन स्थिरीकरण प्रकल्प कार्यपद्धतीचा अभ्यास केला. तसेच पद्मश्री पोपटराव पवार यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख वक्ता म्हणून सहभागी होण्याचे निमंत्रणही दिले.
नेब्रास्का वॉटर सेंटर, नेब्रास्का युनिव्हर्सिटी, लिंकनचे संचालक डॉ. चित्तरंजन रे आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, भुवनेश्वरचे माजी अधिष्ठाता तसेच एस.ओ.ए. युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर क्लायमेट स्मार्ट ॲग्रीकल्चरचे संचालक डॉ. रवींद्र कुमार पांडा यांनी हिवरे बाजारातील पाणलोट क्षेत्रास भेट दिली. भेटीदरम्यान मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. सचिन कुमार नांदगुडे यांनी सध्या सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण पाणलोट क्षेत्रातील कार्बन स्थिरीकरण प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. हिवरे बाजारात सुरू असलेल्या क्लायमेट स्मार्ट पाणलोट क्षेत्रातील कार्बन स्थिरीकरण प्रकल्पाचे कौतुकही पाहुण्यांनी केले. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांची भेट घेऊन नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, पाणलोट क्षेत्र विकास आणि ग्रामविकासातील हिवरे बाजारच्या क्रांतिकारक कार्यावर चर्चा झाली. अशाच प्रकारचे काम ओडिशा राज्यात सुरू करण्याची तयारी डॉ. चित्तरंजन रे आणि डॉ. रवींद्र कुमार पांडा यांनी दर्शवली.
या कामासाठी पद्मश्री पवार यांनी तांत्रिक मार्गदर्शन, मदत आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले. देशातील इतर भागांतही असे प्रकल्प सुरू व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याच अनुषंगाने पोपटराव पवार यांना अमेरिकेतील विद्यापीठात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख वक्ता म्हणून सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले. या कार्यक्रमाचे विद्यापीठातील नियोजन डॉ. संगीत शिंदे, सुनील साळुंखे व संतोष कहर यांनी केले, तर हिवरे बाजारातील कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रक्षेत्र भेट प्रसन्ना पवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.