दहीहंडी, अनंत चतुर्दशी दिवशी सुट्टी जाहीर करा, शिवसेनेची आग्रही मागणी

राज्य सरकारने नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणांना सुट्टी जाहीर केल्यानंतर दहीहंडी व अनंत चतुर्दशी दिवशीची सुट्टी रद्द केली आहे. यामुळे गोविंदा आणि गणेशभक्तांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यामुळे दहीहंडी, अनंत चतुर्दशी दिवशी सुट्टी जाहीर करा, अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुंबईत दहीहंडीला गोविंदांमध्ये मोठा उत्साह असतो. अनंत चतुर्दशीला विसर्जनाच्या मोठय़ा मिरवणुका निघतात. यामध्ये मुंबईकर नोकरदारही लाखोंच्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे या दोन्ही दिवशी सुट्टी जाहीर करणे महत्त्वाचे असल्याचे चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पालिकेच्या सुट्टय़ांत बदल नको

पालिकेने या वर्षी जानेवारी व मार्चमध्ये जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टय़ांच्या दोन्ही परिपत्रकात 16 ऑगस्ट दहीहंडी व 6 सप्टेंबर अनंत चतुर्दशी या सुट्टय़ा जाहीर केल्या होत्या. ऐनवेळी पालिकेने नारळी पौर्णिमा आणि गौरी विसर्जनाची सुट्टी जाहीर केल्यामुळे दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द होणार आहे. दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीची सुट्टी शनिवारी आल्याने कामगारांना सुट्टीला जोडून रविवारची रजा उपभोगता आली असती. पण या सुट्टय़ा रद्द केल्यामुळे आखलेले कार्यक्रम रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर येईल. हे लक्षात घेता पालिकेच्या सुट्टय़ांमध्ये बदल करू नका, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केली आहे.