भाजपचा व्हायरस राष्ट्रवादीत घुसला; अजितदादांचा पक्षावर ताबा राहिला नाही, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

भारतीय जनता पक्षाचा व्हायरस अजित पवारांच्या पक्षात शिरला आहे. अजित पवार यांचा आपल्या पक्षावर ताबा राहिलेला नाही, त्यामुळेच त्यांना डावलून सूरज चव्हाणला बढती देण्यात आली, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना केला. तसेच 2029 आधी अजित पवारांच्या पक्षातील एक गट भाजपमध्ये जाईल, असा दावाही त्यांनी केला.

अजित पवार खमके नेतृत्व आहे. विचार सोडून ते भाजपमध्ये गेले. अजित पवारांच्या पक्षात आमदार, स्वत: एकत्रित आहे असे दिसते, पण त्यांचा पक्ष खरंच त्यांच्या हातात राहिला आहे का? असा सवार करत रोहित पवार म्हणाले की, सूरज चव्हाणला आधी निलंबित केले आणि आता त्याला बढती दिली. लातूरमध्ये छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर अजित पवारांनी सूरज चव्हाणच्या निलंबनाचे ट्विट केले होते. पण मारहाण झालेल्या व्यक्तीचे फ्रॅक्चर वाळायच्या आधीच मारहाण करणाऱ्याला बढती दिली.

सूरज चव्हाणला नियुक्तीचे पत्र दिले तेव्हा अजित पवार फोटोत दिसत नाहीत. यातून दोन प्रश्न निर्माण होतात. सूरज चव्हाणला बढती देण्यात अजित पवार यांचा रोल होता की नाही? लातूरमध्ये मारहाण झालेली तेव्हा अजित पवार यांनी केलेले निलंबनाचे ट्विट खरे की खोटे होते? तुमच्या पक्षात, पदाधिकाऱ्यांवर तुमचे नियंत्रण राहिले नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी केला. सूरज चव्हाणला बढती देण्याचा निर्णय सर्व मुख्य नेत्यांना विश्वासात घेऊन घेण्यात आल्याचे सुनील तटकरे म्हणतात. मग अजित पवार मुख्य नेत्यात येत नाहीत का? ज्या नेत्याने पक्ष वेगळा गेला, साहेबांची साथ सोडली, आमदार निवडून आले त्यात नेत्याला पक्षात वेगळे केले जात असेल तर यावरून समजून जा. भाजपचा व्हायरस आधी राष्ट्रवादी काँग्रेसला लागला. त्यातून आमचा पक्ष तोडला आणि आता अजित पवार, एकनाथ शिंदेंचा गट भाजपचा व्हायरस तोडतो हे स्पष्ट दिसत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार पुढे म्हणाले की, बाहेरून वाटते अजित पवार प्रमुख आहेत. पण कोकणातील नेत्याने अजित पवार यांचा पक्ष हायजॅक केला आहे. कारण 2029 च्या एक दीड वर्ष आधी सर्व पदाधिकारी, नेते, आमदार घेऊन ते भाजपात जातील. सूरज चव्हाणच्या नियुक्तीवरूनही अजित पवारांच्या पक्षात दोन गट पडल्याचे दिसते. दादांना डावलून ही नियुक्ती करण्यात आली असावी. दुसरीकडे छगन भुजबळ किंवा त्यांच्या पक्षातील नेत्याला नाशिकचे पालकमंत्रीपद मिळावे अशी त्यांची इच्छा होती. पण दादांचे आणि त्यांच्या पक्षाचेही भाजपपुढे काही चालत नाही, असे दिसते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्यात आला. आता मुंबईमध्ये मराठी-अमराठी, मांसाहारी विरुद्ध शाकाहारी असा नवीन वाद निर्माण केला जात आहे. लोकांनी यातच गुंतून पडावे असे भाजपला वाटते. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था यावर कुणाला बोलायचे नाही, म्हणून हे वाद निर्माण केले जात असून हा भाजपचा ट्रॅप असल्याचे रोहित पवार म्हणाले. यावर अजित पवारांनी बोलावे. हे द्वेष, विष पेरण्याचे काम मित्रपक्ष करत असताना अजित पवारांनी त्याच्या विरोधात उभे राहिले पाहिजे, असेही रोहित पवार म्हणाले.