शिवसेनेची तिरंग्याला सलामी, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तिरंगा फडकवला आणि ‘वंदे मातरम…’, ‘भारतमाता की जय…’ अशा गगनभेदी घोषणांनी शिवसेना भवनाचा परिसर दुमदुमला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शिवसेना भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. या ध्वजारोहण सोहळय़ासाठी शेकडो शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने तिरंगा राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी ध्वजारोहणाला उपस्थित असलेल्या प्रत्येक शालेय विद्यार्थ्याची विचारपूस केली आणि सर्व मुलांसोबत छायाचित्रेही काढली.

याप्रसंगी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार ऍड. अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, सचिन अहिर, मिलिंद वैद्य, आमदार महेश सावंत, शिवसेना सचिव सुधीर साळवी, साईनाथ दुर्गे, शीतल देवरुखकर, सुप्रदा फातर्पेकर, माजी महापौर महादेव देवळे, महिला विभाग संघटक श्रद्धा जाधव आदी उपस्थित होते.

झंडा ऊंचा रहे हमारा…

हिंदुस्थानच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवारी दादर येथील शिवसेना भवनाच्या प्रांगणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार ऍड. अनिल परब उपस्थित होते.