
गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने आज गोविंदा पथकांवर ‘कृपावृष्टी’ केली. डीजेचा सूर आणि पावसाच्या सरी यामुळे गोविंदा पथकाच्या आनंदाला अधिकच उधाण आले होते. दरम्यान, राज्यात येत्या 21 तारखेपर्यंत अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवरील समुद्र खवळलेला राहणार असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन राज्याच्या आपत्कालीन विभागाने केले आहे.
मुंबईच्या तुलनेत उपनगरात तीन पट पाऊस
मुंबईत दिवसभर पाऊस कोसळत होता, पण पावसाला न जुमानता दहीहंडी उत्सव मोठय़ा जोशात साजरा करण्यात आला. मागील चोवीस तासात मुंबईच्या उपनगरात सर्वाधिक म्हणजे 244.7 मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल मुंबई शहरात 83 मिमी, रत्नागिरीत 75.5 मिमी, सिंधुदुर्गात 38.9 मिमी पावसाची नोंद झाली. कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
समुद्र खवळणार
कोकण किनारपट्टीवर 20 ऑगस्टपर्यंत ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असून समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे मुंबईकर पर्यटकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात नद्यांना पूर
रायगड जिह्यातील अंबा, कुंडलिका आणि रत्नागिरी जिह्यातील जगबुडी, कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून एनडीआरएफ व एसडीआरएफला सतर्क राहण्याच्या सूचना राज्याच्या आपत्कालीन विभागाने दिल्या आहेत.
मुंबईला सोमवारी यलो अलर्ट
मुंबई शहर, उपनगर, नाशिक, नाशिक घाट, नगर, धुळे, नंदुरबार, पुणे, संभाजीनगरसह अन्य काही जिह्यांना सोमवारी यलो अलर्ट दिला आहे. मंगळवारीही मुंबई शहर, उपनगर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे व अन्य काही जिल्हय़ांना यलो अलर्ट दिला आहे.
- मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया तुळशी तलावात सर्वाधिक म्हणजे 133 मिमी पावसाची नोंद झाली तर विहार तलावात 123 मिमी, तानसा तलावात 23 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे या तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.