7 दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या किंवा देशाची माफी मागा, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचा इशारा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी आणि निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर आज निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांवर उत्तर देत म्हटले आहे की, निवडणूक आयोग आणि मतदार यादीबाबत त्यांनी (राहुल गांधी) केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत. ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना सात दिवसांच्या आत आपल्या दाव्यांचा पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे किंवा संपूर्ण देशाची माफी मागण्याचे आव्हान केले आहे.

राहुल गांधींचे नाव न घेता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, “तुम्ही माझ्या सर्व मतदारांना गुन्हेगार ठरवत आहात आणि निवडणूक आयोग गप्प राहणार? हे शक्य नाही. प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल, देशाची माफी मागावी लागेल, तिसरा पर्याय नाही. जर सात दिवसांत प्रतिज्ञापत्र मिळाले नाही तर याचा अर्थ असा की, हे सर्व आरोप निराधार आहेत. आमचे मतदार खोटे आहेत, असे जो कोणी म्हणत आहे, त्याने माफी मागावी.”

ते पुढे म्हटले, “मला हे सुद्धा सांगायचे आहे की, विश्वासाबाबत जो प्रश्न उपस्थित झाला होता, मी यापूर्वीही सांगितले आहे की, मतदारांच्या बाबतीत, हिंदुस्थानात 60 टक्क्यांहून अधिक मतदान होते, ज्याचा विचार जगातील मोठमोठे लोकशाही देशही करू शकत नाहीत. जगातील सर्वात मोठी मतदार यादी आपल्याकडे आहे. सुमारे 90-100 कोटींच्या दरम्यान. सर्वात मोठी मतदार यादी, सर्वात मोठी निवडणूक कर्मचाऱ्यांची फौज, सर्वाधिक मतदान करणाऱ्या लोकांची संख्या आणि या सर्वांसमोर, सर्व मीडियासमोर असं म्हणणं की, जर मतदार यादीत तुमचं नाव एकदा जास्त असेल, तर तुम्ही दोनदा मतदान केलं असेल आणि म्हणजेच तुम्ही कायदेशीर गुन्हा केला आहे.”

ज्ञानेश कुमार म्हणाले, “कदाचित म्हणूनच 1 ऑगस्टपासून कोणत्याही राजकीय पक्षाने एकही आक्षेप नोंदवलेला नाही. याचा अर्थ फक्त दोन गोष्टी असू शकतात, मसुदा यादी पूर्णपणे बरोबर आहे का? जे निवडणूक आयोग मानत नाही, निवडणूक आयोग म्हणत आहे की, त्यात चुका असू शकतात. चला त्या दुरुस्त करूया, अजून 15 दिवस शिल्लक आहेत. जर 1 सप्टेंबरनंतरही अशाच प्रकारचे आरोप येऊ लागले तर, जबाबदार कोण? प्रत्येक मान्यताप्राप्त पक्षाकडे अजूनही 15 दिवस शिल्लक आहेत. मी सर्व राजकीय पक्षांना 1 सप्टेंबरपूर्वी त्यातील चुका दाखवून देण्याचे आवाहन करतो, निवडणूक आयोग त्या दुरुस्त करण्यास तयार आहे.”